Solapur Crime News | इंदापूरमध्ये अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार
11:21 AM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पिडीतेला धमकावत जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमीर महमद सय्यद (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल झालेल्या फिर्यादीवरून, निर्भयाचे वय वर्षे १६ वर्षे ८ महिने असून अल्पवयीन आहे. ती मागासवर्गीय आहे. निर्भयाच्या घरी जाऊन आरोपीने “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिचा हात धरून अंगाकडे ओढत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे.
Advertisement
चालू महिन्यात निर्भयेचा इयत्ता अकरावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर ती कॉलेजमधून घरी जात असताना आरोपीने तिला त्याच्या स्विफ्ट चारचाकी वाहनात बसवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने वाहन आडवळणाच्या ठिकाणी उभे करून निर्भयेला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत ठेवणार नाही. तुम्ही गरीब आहात, माझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही,” अशी धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २८ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास भाटनिमगाव येथे घडल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
गुन्ह्याचा तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Advertisement