अल्पवयीन मुलीने केला चिमुरडीचा खून
वाठार :
कराड तालुक्यातील वाठार (ता. कराड) येथे पाच वर्षीय बालिकेचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलीनेच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिच्याकडे कसून तपास सुरु आहे. संस्कृती रामचंद्र जाधव (वय 5, रा. वाठार, ता. कराड) असे खून झालेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, संस्कृती जाधव ही चिमुकली गुरुवार 10 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली. परंतु, ती मिळून आली नाही. अखेर याबाबतची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी वाठार येथे दाखल होत रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती मिळून आली नव्हती.
शुक्रवार 11 रोजी पहाटे 5 वाजता कराड तालुक्यातील वाठार-रेठरे रस्त्यालगत बेपत्ता संस्कृती जाधव या बालिकेचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, तपासाअंती एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने किरकोळ कारणावरून संस्कृतीचा ओढणीने खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयित अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांकडे कसून तपास सुरू आहे.
या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वाठारसह परिसरातील नागरिकांत तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहेत. घटना समजताच कराड दक्षिणसह तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
- गुरुवारी सायंकाळी संस्कृती हरवली
गुरूवारी सायंकाळी संस्कृती बराच वेळ घरी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील ज्योती शिंदे यांनी संस्कृती हरवली असल्याची पोस्ट सोशल मीडियाद्वारे गावातील विविध ग्रुपवर दिली. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून काळजीपोटी गावातील नागरिकातून पंचक्रोशीतील विविध गावातील ग्रुपवरती मुलगी हरवल्याची पोस्ट पसरवण्यास सुरुवात केली.
- रात्रभर पोलिसांची तपासणी; सीसीटिव्हीतून उलगडा
बालिका बेपत्ता झाल्याची घटना गंभीरपणे घेत पोलिसांनी रात्री नऊच्या दरम्यान तपासास सुरुवात केली. सातारा व कराड पोलीस दलाच्या पथकाची रात्रभर तपासणी सुरू होती. दहा ते पंधरा पोलिसांचे पथक रात्रभर कार्यरत होते. ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या साहाय्याने तपासणी सुरू होती. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी गावातील सीसीटिव्ही तपासले. त्यात संस्कृती आणि अल्पवयीन मुलगी एकत्र असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीला बोलावून चौकशी केली. या चौकशीत संबंधित मुलीने रात्रीच तिचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृतदेह असलेले ठिकाणही दाखवले. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलीच्या घराजवळीलच शेतात सुमारे 200 ते 250 मीटरवर मृतदेह आढळून आला. या कृत्याचे कारण सांगताना संबंधित मुलीने तीन कारणे सांगितली. त्याची खात्री करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. डॉग स्कॉड वाठारपासून पुढे काले गावच्या दिशेने मार्ग दाखवत होते.
- गावात संताप; पोलीस बंदोबस्तात वाढ
संस्कृतीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गावामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. सातारा पोलिसांतर्फे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. गावातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
- प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री जमलेल्या सुमारे 300 ते 400 नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. लवकरात लवकर तपास करण्याचे आश्वासन दिले. पोलीस पाटील ज्योती शिंदे यांनीही या घटनेसाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले.
- संस्कृतीच्या कुटुंबाला धक्का
मृत संस्कृतीचे वडील रामचंद्र जाधव व्यवसायाने मिस्त्राr आहेत. ते चारचाकी गाड्या दुरुस्तीचे काम करत आहेत. नांदलापूर येथे त्यांचे गॅरेज आहे. त्यांचे मूळ गाव तुळजापूरजवळ असून सुमारे 50 वर्षांपूर्वी ते कामानिमित्त वाठार गावी स्थायिक झाले होते. मृत संस्कृतीचे आजोबा सेंट्रींगची कामे करत होते. संस्कृतीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या कुटुंबाला धक्का बसला होता.
- आरोपीला फाशीची शिक्षा द्या
पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करून पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी. या घटनेत आरोपी मुलीसह तिला कुटुंबाची साथ असण्याची आम्हाला शंका आहे, तरी आरोपीस व त्यांना सहाय्य करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा द्यावी.
- रामचंद्र जाधव मृत संस्कृतीचे वडील