Kolhapur Crime : कोल्हापुरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचे अपहरण; आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी
कोल्हापुरात एकतर्फी प्रेमाचे गंभीर परिणाम
कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. व्ही. आदोने यांनी तरुणास दोषी ठरविले. सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे (वय ३५ रा. टिंबर मार्केट, गवत मंडई) असे त्याचे नाब असून, त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, २० फेब्रुवारी २०१४ रोजी ही घटना घडली होती.
सुहास कांबळे याचे लग्न झाले होते. तरीही तो परिसरातील एका अल्पवयीन मुलीला वारंवार भेटून लग्नासाठी मागणी घालत होता. २० फेब्रुवारी २०१४ रोजी संबंधीत तरुणी मैत्रीणीस भेटण्यासाठी जातअसताना सुहास याने पाठलाग केला. तिला लग्नाची मागणी घातली. पिडीत तरुणीने नकार दिल्याने संतप्त सुहासने तरुणीस मारहाण करुन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले.
काही अंतरावरुन रिक्षाने सातारा येथे नेले. तेथून बेळगांव येथे मित्राच्या दुचाकीवरुन तरुणीला घटप्रभा येथील पामलदेणी गावातील एका खोलीत जबरदस्तीने कोंडून घातले. पिडीत तरुणी बेपत्ता झाल्याने तिच्या आत्याने फिर्याद दिली. यानंतर सुहास कांबळे याला अटक करुन त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. व्ही. आदोने यांच्यासमोर झाली. विशेष सरकारी वकील अॅड. अमिता कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून सुहास कांबळे यास दोषी ठरविले. त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.