Satara Crime : साताऱ्यात अल्पवयीन मुलीचा अत्याचाराच्या प्रयत्नातून निर्घृण खून ! !
आर्या चव्हाण खूनप्रकरणी गावात संताप; आरोपीला पोलिसांकडून अटक
सातारा : सातारा तालुक्यातील सारापडे येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आर्या सागर चव्हाण या शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी राहुल यावन (बय २६) याला अटक केली. त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत डोक्यात बरबंटा घातल्याची कबुली राहुल यादव याने पोलीस तपासात दिली आहे.
दरम्यान, चिडलेल्या ग्रामस्थांनी शनिवार ११ ऑक्टोबर रोजी आरोपीच्या घरावर दगडफेक करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावात शांतता निर्माण झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी, दि. १० दुपारी परीक्षा झाल्यानंतर आर्या वडिलांकडून चावी घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर ती आतल्या खोलीत कपडे काढत होती. त्यावेळी तिच्या घरात व आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून राहुल घरात घुसला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आर्यानि त्याला जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला फरशीवर आपटले व तिला बाथरुमच्या दिशेने ओढत नेले व तिथलाच वरवंटा तिच्या डोक्यात घातला. त्यात आर्या रक्तबंबाळ झाल्याने घाबरलेल्या आरोपीने तेथून पळ काढला.
दरम्यान, थोड्यावेळाने तिचा लहान भाऊ सार्थक हा शाळेतून घरी आला. त्यावेळी त्याला आर्या रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे दिसले. घाबरलेल्या सार्थकने धावत जाऊन वडिलांना ही बाब सांगितली. ग्रामस्थांनी तातडीने तिला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मयत आर्या चव्हाण तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
आर्याचा खून कोणी केला? आर्याला नेमके कोणी मारले? यावरुन जिल्हा रुग्णालय परिसरातही शुक्रवारी तणाव निर्माण तातडीने गावात दाखल झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेगाने तपास करीत राहुल यादव याला ताब्यात घेतले.
घटनेनंतरअवघ्या १३ वर्षाच्या आर्याचा निर्घण खून झाल्याची घटना जिल्ह्यात खळबळ उडाली. सासपडे ग्रामस्थांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या विनंतीनंतर शनिवारी, दि. ११ रोजी सकाळी मृतदेह अंत्यसंस्काराकरता सासपडे येथे आणण्यात आला.
यावेळी जोपर्यंत खून करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले जात नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेगाने तपास करीत या प्रकरणातील संशयित राहुल यादव यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यातूनच चिडलेल्या ग्रामस्थांनी संशयित यादव याच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली. पोलिसांच्या विनंतीनंतर ग्रामस्थ शांत झाले. त्यानंतर दुपारी आर्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आर्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
सासपडे गाव जेवढे शांत तेवढेच संवेदनशील म्हणून ओळखले जाते. या गावातील काही तरुण हे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. तर काही तरुण हे गुन्हेगारी विश्वाच्या मायाजालात अडकले आहेत. पाटण पोलीस तसेच बोरगांव पोलिसांत काही जणांवर गुन्हे दाखल आहेत.
अशातच शाळकरी मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातूनच संशयित राहुल यादवच्या घरावर शनिवारी दुपारी संतप्त ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. घराची तोडफोड करण्याच्या पवित्र्यात ग्रामस्थ होते. परंतु सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सर्व जमावास शांततेचे आवाहन करत कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. गावात मात्र, दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.
बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
संशयित राहुल आणि मृत आर्या यांची घरे काही अंतरावरच आहेत. पोलिसांनी आर्याचे घर व नजीकच्या परिसरात तपासावर लक्ष केंद्रीत केले. आजुबाजूला चौकशी करीत असताना त्यांना राहुल यादव हा घरात घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेगाने त्याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. राहुल यादव हा गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या खाणीच्या परिसरात लपून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तातडीने अटक करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या सातारा मुख्यालयात आणले. तिथे पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खूनाची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सात वर्षापूर्वीच्या घटनेशी संबंध?
आर्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित राहुल यादव याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहेत. खूनानंतर राहुल हा गावात बिनधास्तपणे फिरत होता. मात्र तपास सुरु केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासांत त्याला ताब्यात घेतले. त्याची प्राथमिक चौकशी केली असता राहुल यादव याने सात वर्षांपूर्वीही एका लहान मुलीवर अत्याचाराचा गुन्हा केला होता. त्या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, त्या गुन्ह्यातील मुलींचे पुढे काय झाले हे मात्र, गुढच आहे, आता पोलीस त्या अनुषंगानेही राहुल यादव याची चौकशी करीत आहेत. त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.