सुळेभावी येथील चोरी प्रकरणी नात्यातील अल्पवयीनाला अटक
दुपारी घरातील माणसे झोपल्याचे पाहून दागिन्यांची चोरी
बेळगाव : बाजार गल्ली, सुळेभावी येथे शुक्रवारी झालेल्या चोरी प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी छडा लावला आहे. एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याच्याजवळून 3 लाख 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी घरातील मंडळी घरात असतानाच तिजोरीतील 61 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. घरातील सर्व जण असतानाच चोरी कशी झाली? असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोरही उपस्थित झाला होता.
रविवारी सकाळी सुळेभावी-खणगाव रोडवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून 61 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चोरी करणारा अल्पवयीन मुलगा ज्यांच्या घरी चोरी झाली, त्यांचाच नातेवाईक निघाला आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता घरातील दोघे जण झोपले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून तिजोरी उघडून दागिने पळविल्याची कबुली त्याने दिली आहे. मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक आर. आय. पट्टणशेट्टी, उपनिरीक्षक चंद्रशेखर सी., हवालदार बी. बी. कड्डी, हनुमंत यरगुद्री, चन्नाप्पा हुंचाळ, आर. एच. तळवार, आर. एस. बळुंडगी, टी. जी. सुळकोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.