गुजरातमध्ये मंत्रिपुत्राला घोटाळाप्रकरणी अटक
मनरेगा’च्या कामात 71 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातचे मंत्री बच्चूभाई खबद यांचा पुत्र बलवंत खबद याला 71 कोटी रुपयांच्या मनरेगा घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली. भाजप नेत्याच्या मुलाच्या अटकेची पुष्टी एका अधिकाऱ्याने शनिवारी केली. या घोटाळ्यात काही कंत्राटी एजन्सींना काम पूर्ण न करता किंवा वस्तूंचा पुरवठा न करता सरकारकडून पैसे मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाहोद जिह्यातील तत्कालीन तालुका विकास अधिकारी दर्शन पटेल यांनाही अटक केली आहे. एकंदर या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या सात झाली आहे. देवगडबारिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चूभाई खबद हे राज्य सरकारमध्ये पंचायत आणि कृषी मंत्री आहेत.
गुजरातमधील कथित घोटाळ्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) योजनेअंतर्गत देयके मिळविण्यासाठी बनावट काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि इतर दावे सादर करून 2021 ते 2024 दरम्यान 35 एजन्सींच्या मालकांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून 71 कोटी रुपये लाटल्याचे पोलिसांनी सांगितले. बलवंत खबद हा यापैकी एका एजन्सीचा मालक असून त्याच्यावर आदिवासी बहुल दाहोद जिह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यात येणाऱ्या भागात मनरेगा कामांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.