For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोट्यावधींच्या रोकडप्रकरणी मंत्र्यांचा सचिव, नोकर अटकेत

06:23 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोट्यावधींच्या रोकडप्रकरणी मंत्र्यांचा सचिव  नोकर अटकेत
Advertisement

ईडीची कारवाई : 37 कोटींहून अधिक रक्कम जप्त,  मंत्र्यांवरही अटकेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांच्या नोकराला ईडीने मंगळवारी रात्री उशिराने अटक केली. तपास यंत्रणेने सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवसात 37 कोटी 20 लाख रुपयांहून अधिक रोख जप्त केली आहे. याशिवाय ईडीने अनेक कागदपत्रे जप्त केली असून त्यात ट्रान्सफर-पोस्टिंगशी संबंधित तपशील आहेत. याशिवाय ग्रामीण विकास विभागातील अनियमिततेबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी झारखंडच्या मुख्य सचिवांना लिहिलेले पत्रही ईडीला मिळाले आहे.

Advertisement

राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील अनियमिततेच्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने संजीव लालचा नोकर जहांगीर याच्या ताब्यात असलेल्या रांची येथील फ्लॅटवर छापा टाकला होता. रात्रभर चौकशी केल्यानंतर दोघांना पीएमएलए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. झारखंड सरकारचे ग्रामीण विकास विभाग मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांना 6 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंतच्या चौकशीनंतर अटक करून एजन्सीने त्यांना मंगळवारी सकाळी विशेष न्यायालयात हजर केले. ईडीने चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 6 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. आता बुधवारपासून त्यांची कोठडीमध्ये चौकशी सुरू होणार आहे.

झारखंड सरकारचे मंत्री आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरून 37 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या रकमेच्या वसुलीनंतर आता मंत्री आलमगीर आलमही अडचणीत सापडले आहेत. आता ईडी या संपूर्ण प्रकरणात झारखंड सरकारचे मंत्री आलमगीर आलम यांच्याकडून या रकमेचा हिशेब मागण्याची तयारी करत आहे. चौकशीअंती मंत्र्यांवरही अटकेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नोकर पैशांचा केअरटेकर

सोमवारी ईडीने आलमगीर आलमचा पीएस, नोकर आणि त्याच्या इतर जवळच्या साथीदारांच्या घरावर छापे टाकले होते. कमिशन आणि लाचेच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशाचा तो काळजीवाहू होता, त्यासाठी महिन्याला सुमारे 15 हजार ऊपये मिळत असल्याची कबुली नोकर जहांगीर आलम याने प्राथमिक चौकशीत दिली आहे. मंत्री आलमगीर यांनी स्वत: जहांगीरला आपल्या सचिवाकडे कामावर ठेवले होते. मंत्र्यांचे पीएस संजीव लाल यांनी त्यांच्यासाठी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संजीव लाल आपल्या नोकराकडे दर एक-दोन दिवसांनी पैशांची एक बॅग द्यायचा. ही बॅग तो फ्लॅटच्या कपाटात ठेवत असे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणखी एका साथीदाराच्या ठिकाणाहून 10 लाख ऊपये आणि 2 कोटी 93 लाख ऊपये जप्त केले आहेत. मंत्र्यांचे पीएस संजीव कुमार लाल यांनी नोकर जहांगीरच्या फ्लॅटमधून मिळालेले पैसे हे त्यांचेच असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते. मात्र, पुरावे आणि जहांगीरच्या जबाबानंतर ईडीने त्याला अटक केली. ईडीने पीएस संजीवलाल यांची चौकशी केली तेव्हा ते पुन्हा पुन्हा बेशुद्ध होत होते.

Advertisement
Tags :

.