मंडळ अध्यक्ष निवडीत मंत्री, आमदारांचा वरचष्मा
चाळीसपैकी तब्बल 36 मतदारसंघात निवड पूर्ण : मडकई, वेळ्ळी, बाणावली, नुवेतील निवडी प्रलंबित
पणजी : गेल्या अनेक दिवसांत भाजपच्या मंडळ अध्यक्ष निवडीची चर्चा रंगली असताना अनेक कार्यकर्त्यांची चाचपणी करण्यात आली. अखेर भाजपच्या मंडळ अध्यक्ष निवडीत मंत्री, आमदार यांचाच वरचष्मा दिसून आला. राज्यातील 36 मतदारसंघातील अनेक मतदारसंघात मंत्री, आमदार यांच्या जवळच्याच कार्यकर्त्यांची मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे.
फोंडा मतदारसंघ मंत्री रवी नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. तो या मंडळ अध्यक्ष निवडीतही दिसून आला. याचे कारण म्हणजे माजी सरपंच तथा विद्यमान पंच हरिष नाईक यांची भाजपच्या मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात रवी नाईक गटाला यश प्राप्त झाले आहे. दुसरीकडे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते तथा विद्यमान नगरसेवक विश्वनाथ दळवी गटाच्या पदरात निराशा आली आहे.
शिरोडा मतदारसंघातही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला संधी न मिळता जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्या डॉ. गौरी शिरोडकर यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे. पर्वरी मतदारसंघात विनीत परब यांची मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याने या मतदारसंघात उत्साह दिसून आला. विनीत परब यांचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केले आहे. पणजी मतदारसंघाच्या मंडळ अध्यक्षपदी ब्रिजेश शेट्यो यांची निवड केलेली आहे.
शिवोलीत लोबो समर्थकाची निवड
शिवोली मतदारसंघही मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत चुरशीचा ठरला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार डिलायला लोबो व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या समर्थकांमध्ये मंडळ अध्यक्षाबाबत चुरस चालली होती. परंतु अखेर शिवोलीच्या मंडळ अध्यक्षपदी मोहीत चोपडेकर यांना निवडण्यात आले.
कुंभारजुवेत योगेश पिळगावकर
कुंभारजुवे मतदारसंघात आमदार राजेश फळदेसाई यांचे समर्थक योगेश पिळगावकर हे मंडळ अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत. सांताक्रुझ मतदारसंघात आमदार ऊदाल्फ फर्नांडिस यांनी पक्ष नेतृत्वाला मंडळ अध्यक्ष निवडण्यासाठी सांगितल्याने या ठिकाणी चिंबलचे सरपंच संदेश चोडणकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
पेडण्यात प्रवीण आर्लेकर नाराज
पेडणे मंडळ अध्यक्षपदी सिद्धेश पेडणेकर यांना निवडण्यात आलेले आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पसंतीच्या व्यक्तीची या ठिकाणी वर्णी लागलेली नसल्याने आर्लेकर समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. परंतु सिद्धेश पेडणेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आमदार आर्लेकर यांनी हेवेदावे बाजूला ठेवून पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी निवडण्यात आलेल्या अध्यक्ष निवडीमध्ये दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्होंचे समर्थक सचिन चौगुले, मुरगाव मतदारसंघात अविनाश नाईक, फातोर्डा मतदारसंघात श्वेता लोटलीकर यांची वर्णी लागलेली आहे.
चार मतदारसंघातील निवड प्रलंबित
भाजपच्या मंडळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आतापर्यंत 36 मतदारसंघात अध्यक्ष निवड झालेली असून, उर्वरित मडकई, वेळ्ळी, बाणावली, नुवे मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रिया प्रलंबित ठेवलेली आहे. काही मतदारसंघात भाजपचे जुने कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांनी पक्षासाठी आधीपासूनच कार्याला सुरवात केल्याने या चार मतदारसंघांतील निवड प्रलंबित ठेवली असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस गोव्यात
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार अरूण सिंग यांचे काल रविवारी संध्याकाळी गोव्यात आगमन झाले. आमदार संकल्प आमोणकर व माजी आमदार दामू नाईक यांनी त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सरचिटणीसांचे गोव्यात आगमन झालेले आहे. आपल्या दौऱ्यात अरूण सिंग भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत.