मंत्र्याने माझ्याकडून उकळले 20 लाख रुपये
पांडुरंग मडकईकर यांच्या विधानाने खळबळ
पणजी : माजी मंत्री आणि भाजप नेते पांडुरंग मडकईकर यांनी विद्यमान सरकारमधील मंत्री हे केवळ भ्रष्टाचारच करीत नाहीत तर त्यांनी लूट चालवलेली आहे, असे निवेदन करून फक्त आपल्या एका फाईलसाठी आपल्याला 15 ते 20 लाख रुपये एका मंत्र्याला द्यावे लागले, अशी व्यथा मांडली. पांडुरंग मडकईकर यांच्या या निवेदनाने गोव्यात एकच खळबळ उडालेली आहे. खुद्द भाजपचाच नेता असलेल्या मडकईकर यांनी जे काही निवेदन केले त्यातून त्यांनी सरकारची लक्तरेच काढली. मडकईकर पुढे म्हणाले की गोव्यातील मंत्री सध्या केवळ पैसे मोजण्यात गर्क आहेत. भ्रष्टाचाराला देखील काही मर्यादा असायला हवी, परंतु भ्रष्टाचार मर्यादेपलीकडे जाऊन गोव्यात अक्षरश: मंत्र्यांनी लूट चालवलेली आहे. आपली एक साधी फाईल हातावेगळी करण्यासाठी एका मंत्र्याने 15 ते 20 लाख रुपये मागून घेतले. सदर मंत्री कोण हे आपण आज सांगणार नाही परंतु ज्या दिवशी आपण हा पक्ष सोडून जाईल त्यावेळी निश्चितच त्या मंत्र्याचे नाव उघड करीन, असे सांगून मडकईकर यांनी गोव्यातील विद्यमान भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. मडकईकर यांनी हे निवेदन काही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आपल्याला याबाबतीत फार खेद होतोय, असेही ते म्हणाले.