विद्यार्थ्यांच्या संशोधनाला मंत्र्यांचे समर्थन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक महत्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे जुन्या डीझेल वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात 90 टक्के घट होऊ शकते. केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या संशोधनाचे कौतुक केले असून या संशोधनला आपले समर्थन घोषित केले आहे. या विद्यार्थ्यांनी एक असे उत्सर्जन नियंत्रण साधन विकसीत केले आहे, की जे जुन्या डीझेल वाहनांमध्ये बसविल्यास प्रदूषणात प्रचंड प्रमाणात घट होते. या साधनामुळे जुन्या ट्रक्स आणि चारचाकी वाहने पर्यावरणस्नेही बनणार आहेत. केंद्र सरकार या साधनाला मान्यता देणार असून ते लवकरच जुन्या ट्रक्समध्ये बसविण्याचा आदेश देण्यात येणार आहे. या साधनाचे नामकरण रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाईस असे आहे. आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी ते दोन वर्षांच्या प्रयत्नांच्या नंतर विकसीत केले आहे. जुन्या वाहनांचा धूर जेथून बाहेर पडतो, तेथे हे साधन बसवायचे असते. हे साधन धूर गाळून हवेत सोडते. त्यामुळे हवेत पसरणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येते.