मंत्री सतीश जारकीहोळींकडून विकासकामांचा आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक : उपाययोजना करण्याची सूचना
बेळगाव : जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा व विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, प्रांताधिकारी श्रवण नायक उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या सद्य:स्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. वाढते तापमान व पावसाच्या अनिश्चिततेमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्र्यांनी घेतला.
पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्मयता असलेल्या ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची माहिती घेऊन पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जलस्रोतांचे संवर्धन, कूपनलिकांची देखभाल व आवश्यक दुऊस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. बैठकीत बेळगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरही चर्चा झाली.
शहरातील काही भागांत उद्भवणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्या, वितरण व्यवस्थेतील अडचणी व पाणीपुरवठा योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा, रस्ते, सार्वजनिक इमारती, मूलभूत सुविधा व इतर पायाभूत प्रकल्पांचा आढावाही घेण्यात आला. विकासकामांची गुणवत्ता, कामांची गती व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देण्यावरही चर्चा करण्यात आली. सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.