जिल्हाधिकारी कार्यालय विकासकामांची मंत्री सतीश जारकीहोळींकडून पाहणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरण व विविध विकासकामांची सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. कार्यालय परिसराचे सुशोभिकरण, नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करत असल्याने सर्व कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. पाहणीदरम्यान कार्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन ध्वजस्तंभाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच हल्मडी शिलालेखाच्या प्रतिकृतीच्या संवर्धनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. तसेच कार्यालय परिसर अंतर्गत रस्त्यांचे आधुनिकीकरण, सुबक पायाभूत सुविधा व नागरिकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. या सर्वसमावेशक विकास आराखड्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नकाशाच्या माध्यमातून मंत्री सतीश जारकीहोळी यांना सादर केली. यावेळी आमदार आसिफ सेठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.