3 देशांच्या दौऱ्यावर जाणार विदेश राज्यमंत्री मार्गेरिटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशराज्यमंत्री आणि वस्त्राsद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा हे 4-10 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रातील तीन देशांच्या (इक्वेडोर, बोलिविया आणि क्यूबा) अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयानुसार या दौऱ्यादरम्यान मंत्री मार्गेरिटा या देशांच्या राजकीय नेतृत्वाची भेट घेत द्विपक्षीय संबंधांची प्रगती, व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, विकास सहकार्य आणि क्षमतानिर्मितीशी निगडित मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याचबरोबर ते भारतीय समुदाय आणि व्यावसायिक प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
मार्गेरिटा हे इक्वेडोरमध्ये क्विटो येथे भारताच्या नव्या मिशनच्या स्थापनेच्या तयारींची समीक्षा करणार आहेत. बोलिविया येथे 8 नोव्हेंबर रोजी ला पाज येथे होणाऱ्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात ते भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर क्यूबामध्ये त्यांचा कार्यक्रम आरोग्य, चिकित्सा, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्षमतानिर्मितीच्या क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यावर केंद्रीत असेल. हा दौरा भारत आणि संबंधित देशांदरम्यान सहकार्य आणि विकासाच्या दिशेने परस्पर प्रतिबद्धतेला आणखी मजबूत करणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत आणि इक्वेडोरदरम्यान 1969 मध्ये राजनयिक संबंध प्रस्थापित झाले होते. सध्या बोगोटा (कोलंबिया) येथील भारतीय दूतावास इक्वेडोरसाठी मान्यताप्राप्त आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत 5 फेऱ्यांमध्ये दूतावास स्थापनेविषयी चर्चा झाली आहे.