उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या जिल्ह्यातच घोटाळा! वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून अनेकांना गंडा
महिलेसह दोघे जेरबंद, शहर डी.बी पथकाची कारवाई
सातारा प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री असणाऱ्या सातारा जिल्ह्यातच वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून फसवणूक सुरू असलेल्या उघड झाले आहे. सातारा येथील एकाला वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देतो असे सांगून 75 लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाला बेंगलोर येथून जेरबंद केले आहे. विनायक शंकर रामुगडे (वय 44 वर्षे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याने साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील अनेक लोकांची अशाच प्रकारे कोट्यावधी रूपये घेवून फसवणूक केल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्री याप्रकरणी लक्ष घालून प्रकरण तडीस नेणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. रामुगडे हा सन 2018-2019 पासून तो फरार होता. त्याच्यासह महिला साथीदार कलावती उर्फे प्रिया रामचंद्र चव्हाण (वय 43 वर्षे मूळ रा. कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा सध्या रा. शाहूनगर, गोडोली सातारा) हिला ही अटक करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी याच गुह्यात अनुजा मंगेश जाधव (वय 26 वर्षे रा. चंदननगर कोडोली सातारा), कुणाल अमर भांडे (वय 24 वर्षे रा. शाहुनगर गोडोली सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2014-2015 चे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी करण्यात आली होती. या ठिकाणी असणारे वाईन शॉप, देशी दारूचे लायसन्स हे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने इतर ठिकाणी ट्रान्सफर करून देतो असे सांगून विनायक शंकर रामुगडे याने कलावती उर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण हिच्या मदतीने सन 2018-2019 मध्ये सातारा येथील एका व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून वेळोवेळी विविध कारणे सांगून एकूण 75 लाख घेतले. परंतू लायसन्स न देता त्याने पलायन केले होते. विनायक याला फिर्यादींनी वारंवार विविध प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो मिळून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2024 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी. बी. पथक संशयित विनायक रामुगडे याचा शोध घेत होते. त्याची माहिती घेत असताना अत्यंत धक्कादायक बाबी समोर येवू लागल्या. विनायकने एका महिलेच्या मदतीने कोरेगाव, पुणे, मुंबई अशा ठिकाणी अशाच प्रकारे लोकांना वाईन शॉपचे लायसन्स देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून कोट्यावधी रूपये घेवून तो फरार झालेला होता. संबंधित तक्रारदार लोकांनी त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच या विनायकने परराज्यामध्ये देखील लोकांना वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक केली असल्याचे तपासात समजून येवू लागले. विनायक हा सन 2018-2019 पासून परांगदा झालेला होता.
वेशभुषा, सीमकार्ड, राहण्याचे ठिकाणात करत होता बदल
त्याचा शोध विविध पोलीस ठाण्याचे पोलीस घेत होते. परंतू तो स्वत:चे अस्तिव लपवण्यासाठी स्वत:चे नाव बदलून व बनावट ओळखपत्र वापरून, दाढीचे कट बदलून, केसांचा विग वापरून तसेच दुसऱ्या वाहनांचे नंबर वापरून परराज्यातून फिरत होता. दुसऱ्याचे नावे वेळोवेळी वेगवेगळे सीमकार्ड, मोबाईल घेवून व ते देखील काही कालावधीसाठी वापरून नवीन सीमकार्ड घेत असल्याने तसेच परराज्यामध्ये वेगवेगळया लॉजला राहत असल्याचे त्याचा निश्चित ठावठिकाणा व ठोस माहिती मिळून येत नव्हती. तसेच त्यास मोबाईलचे तांत्रिक माहितीचे ज्ञान अवगत असल्याने तो अत्यंत चाणाक्ष पणाने वावरत असल्याने बऱ्याच वर्षापासून मिळून येत नव्हता. त्याच्यावर यापूर्वी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याने तो सराईत झालेला होता.
सलग चार दिवस बेंगलोर मधील विविध ठिकाणी चौकशी
सातारा शहर डी.बी. पथकाने अत्यंत चिकाटीने विविध जिह्यातून तसेच हैद्राबाद, तेलंगणा, कनार्टक, आंध्रप्रदेश या राज्यात संपर्क करून चौकशी करून तसेच फिर्यादी यांच्याकडून विनायकची माहिती प्राप्त केली. विनायक हा बेंगलोर, हैद्राबाद, आंध्रप्रदेश शहरामध्ये वावरत असल्याचे समजल्यावर सातारा शहर डी.बी. चे एक पथक बेंगलोर याठिकाणी जावून त्यांनी सलग चार दिवस-रात्र बेंगलोर शहरामध्ये विविध ठिकाणी चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून काही उपयुक्त माहिती प्राप्त केली. विनायक हा शहरामध्ये विविध ठिकाणी तसेच वाहनामध्ये राहत असल्याने व कोणालाही त्याचा ठावठिकाणा समजून देत नव्हता. त्याचा निश्चित ठावठिकाणा समजून येत नव्हता.
पोलिसांनी ट्रॉफिक केले जाम
तपासादरम्यान विनायक हा बेंगलोर शहरातून एका हायवे लगतचे सर्व्हिस रोडने इनोव्हा कारने परराज्यात जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. यापूर्वी काही तक्रारदार लोकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चारचाकी वाहनातून सुसाट पळून गेला होता. अशी माहिती मिळाली असल्याने सातारा शहर पोलीसांनी तो वाहनातून पळून जावू नये याची दक्षता घेवून तो येण्याच्या रोडला काही वेळापूरते ट्राफिक जाम केले. व त्याचे वाहनाचे मागे व पुढे पोलिसांनी खाजगी वाहन लावून त्यास ट्राफिक मध्ये पकडून त्यास ताब्यात घेतले.
या गुन्हयामध्ये एका महिलेचा देखील सहभाग असल्याने महिलेस देखील शिताफीने पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. विनायकला आणखी कोणी गुन्हे करण्यास मदत केली आहे तसेच कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
परराज्यातील लोकांची फसवणूक
विनायक व कलावतीकडे एकूण 10 मोबाईल, अनेक सीमकार्ड, बनावट ओळखपत्रे, केसांचा विग मिळून आलेले आहे. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केल्यावर त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच परराज्यामध्ये बऱ्याच लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येवू लागली आहे. या दोन्ही संशयितांना या गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली असून त्यांची चार दिवस पोलीस रिमांड घेण्यात आली आहे.
तपासाचे शिलेदार
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने (सध्या नेमणूक प्रभारी वाठार पोलीस ठाणे) पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अविनाश गवळी पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, विक्रम माने, पोलीस कॉन्टेबल इरफान मुलाणी, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, सचिन रिटे, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले, महिला कॉन्स्टेबल प्रियांका धनावडे, कोडोली गावचे पोलीस पाटील राजेंद्र भोईटे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्टेबल महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे यांनी केलेली आहे.