पुणे-बेंगळुरू महामार्ग विस्तारीकरणातील त्रुटी दूर करू ; मंत्री नितीन गडकरी यांची खासदार मंडलिकांना ग्वाही
खासदार मंडलिक यांनी घेतली मंत्री गडकरींची भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
खासदार संजय मंडलिक यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुणे ते बेंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या चौथ्या लेनवरून सहाव्या लेनच्या विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी गडकरी यांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू अशी ग्वाही खासदार मंडलिक यांना दिली. यावेळी तांत्रिक सल्लागार व पुल बांधकामातील तज्ञ बि.डी.थेंग उपस्थित होते. त्यांना या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी संबधिताना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यापूर्वी कोल्हापूर, सातारा, आणि सांगली येथील लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी या महामार्गातील दिसणाऱ्या त्रुटींबाबत बैठक घेऊन चर्चा केली होती. पंचगंगा नदीजवळील पूल त्याच्या दोन्ही बाजूंनी भरलेल्या भरावावर उतरतो. जो पावसाळ्यात बांधाचे काम करतो. परिणामी पुराचे पाणी खालच्या प्रवाहात सहज जाण्यापासून रोखले जाते. त्यामुळे कोल्हापूर शहरातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी भरावाऐवजी कॉलमवर पूल उभारून बास्केट ब्रीज, पोहच रस्त्याचे कॉलम स्ट्रक्चर वापरून काम करावे लागणार आहे. ज्यामुळे पूरस्थितीत पाण्यासाठी जाण्याचे क्षेत्र वाढेल व पुराचे पाणी जलद निघून जाईल. याबाबत विविध वृत्तपत्रे, अनेक संघटना, असोसिएशन आँफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरस यांच्याकडून होत असलेल्या मागण्या खासदार मंडलिक यांनी मंत्री गडकरी यांना सांगितल्या.
कागल पासून घुणकी पर्यत विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी सांगताना कागल, विकासवाडी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, नागाव, संभापूर, अंबप, किणी येथे उंच व रुंद उड्डाण पुलाची गरज आहे. या पुलांची कामे कॉलम स्ट्रक्चर वापरून करावे लागेल. पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी बोगदे मोठे करणे महत्त्वाचे आहे. या चर्चैनंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यानी एनएच 4 महामार्ग विस्तारीकरणातील सर्व त्रुटी दूर करू अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली. यावेळी चेंबर आँफ काँमर्सचे संचालक विज्ञानंद मुंढे उपस्थित होते.