सुरक्षा रक्षकाविना आंबोलीत आरोग्यसेविकांची रात्रपाळी
आंबोली प्रतिनिधी
आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांना कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसताना अतिरिक्त रात्रपाळी लावण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधूनही उपाययोजना केली जात नसल्याने शनिवार दिनांक 26 जुलै रोजी ओरोस येथे होणाऱ्या जनता दरबारात पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून निवेदन देण्यात येणार आहे.आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेविकांना रात्रपाळी करावी लागत असल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय शासनाकडून कोणतीही वाहन व्यवस्था करण्यात न आल्याने घाटातून स्वतःचे वाहन घेऊन आरोग्य सेविकांना प्रवास करावा लागत असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या जनता दरबारात आरोग्य सेविकांच्या प्रश्नासंदर्भात राणेंचे लक्ष वेधण्यात येणार आहे.