For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

04:23 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश
Advertisement

कणकवली : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

Advertisement

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील ही उपसमिती यापूर्वी दहा मंत्र्यांची होती. नितेश राणे यांच्या समावेशानंतर समितीत आता ११ मंत्री आणि मुख्य सचिवांचा समावेश आहे. राज्यातील कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीवरील परिणाम तसेच आवश्यक उपाययोजनांचा या समितीमार्फत आढावा घेतला जाणार आहे.

मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रश्नांवरही लक्ष

दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता तलाव, जलाशय आणि इतर जलस्रोतांवर आधारित मत्स्यव्यवसायावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा समितीत समावेश झाल्याने मत्स्य उत्पादक आणि मच्छिमारांच्या अडचणींचाही दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये विचार केला जाणार आहे.

Advertisement

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील मत्स्य तलाव, जलाशय आणि संबंधित जलस्रोतांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असून, पाणीसाठा कमी झाल्याने मत्स्य उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची माहिती संकलित केली जात आहे.

परिस्थितीचा नियमित आढावा

उपसमिती दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत शासनाला शिफारसी करणार आहे. पाणी, चारा, शेतीचे नुकसान आणि इतर संबंधित बाबींचे नियोजन करण्यासाठी समितीच्या माध्यमातून निर्णयप्रक्रिया राबविली जाणार आहे.

सिंधुदुर्गसह कोकणातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा या समितीतील समावेश स्थानिक मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

.