For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी मंत्री एम. बी. पाटील सरसावले

06:31 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी  मंत्री एम  बी  पाटील सरसावले
Advertisement

भू-संपादनातील समस्या दूर करण्याच्या सचिवांना सूचना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मंत्री एम. बी. पाटील यांनी सरकारला सूचना केल्या आहेत. पायाभूत सुविधा विकास विभागाचे सचिव डॉ. आर. विशाल यांना निर्देश देऊन धारवाजवळील मोमीगट्टी येथे प्रत्यक्ष भेट देऊन जमीन संपादनाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचना केली आहे.

सध्या असलेल्या रेल्वेमार्गाचे अंतर कमी होऊन इंधन बचत व्हावी या उद्देशाने बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर असा राष्ट्रीय महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग केला जाणार आहे. या प्रकल्पाचा अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. मंगळवारी राज्यातील रेल्वे, विमानतळ व इतर पायाभूत सुविधांच्या विकास प्रगतीचा आढावा घेण्यासाठी खनिज भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या भू-संपादनाच्या कामाला धारवाड जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. काही शेतकऱ्यांनी भू-संपादनाला आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया थांबली होती. नैर्त्रुत्य रेल्वेकडून वारंवार राज्य सरकारला पत्र पाठवून भू संपादन तातडीने करावे, अशी सूचना करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्य सरकारने या प्रकल्पाच्या कामाला गती आणली आहे.

मंत्री एम. बी. पाटील यांनी सचिव आर. विशाल यांना घटनास्थळी भेट देऊन जमीन मालकांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असले तरी धारवाड जिल्ह्यात मात्र भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. एकूण 73.10 कि. मी. लांबीचा हा रेल्वे मार्ग असून 1430 एकर जागेची आवश्यकता लागणार आहे. एकूण 11 रेल्वेस्थानक या मार्गावर होणार आहेत. देसूर, करवीकोप, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगुरू, मोमीगट्टी, कऱ्याकोप्प या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.