कृषी क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे रयत संघाच्या गौरव पुरस्कार वितरण समयी प्रतिपादन
कसबा बीड / वार्ताहर
शेती आणि शेतकऱ्यांसमोर एकरी उत्पन्नवाढीचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे. स्पर्धेच्या युगात एकरी उत्पादन वाढले तरच शेती परवडेल, त्यासाठी कृषि नवतंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचवा असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बालिंगा (ता. करवीर ) येथे रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघातर्फ रयत सेवा गौरव पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरवात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार पी.एन.पाटील आणि पालकमंत्री हसनसो मुश्रीफ या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. दरम्यान, इफको कंपनीच्यावतीने संघाला दहा लाख रुपयांचा औषध फवारणीसाठीचा ड्रोन तसेच दहा लाख रुपये खर्चून तयार केलेल्या कृषी प्रयोगशाळेचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, रयत संस्था ही सभासदांची मालमत्ता असून सेवक भावनेतून विश्वासराव पाटीलांनी पारदर्शी कारभार केल्यामुळे संघाला हा नावलौकीक प्राप्त झाला आहे. रयत सेवा संघाने सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात केलेले काम हे दीपस्तंभासारखे आहे. जो बांधावर जाईल, तोच शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक आणि सहकारी होईल. असे म्हटले आहे.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, श्रीपतराव बोंद्रेदादा, एस. आर. पाटील यांनी घालून दिलेली तत्वे या संघाच्या प्रगतीचा मूलमंत्र आहेत शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा -सुविधा देण्याचे काम रयत संघ निरंतरपणे करीत आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, विश्वासराव पाटील यांनी संघाची धुरा समर्थपणे पेलली आहे. दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर रयत संघाने आपली विश्वासार्हता कायम जपली आहे. दरम्यान विविध पुरस्कारांचे मानकऱ्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेले विविध पुरस्कारांचे मानकरी असे.
रयत सेवा पुरस्काराचे मानकरी : श्रीमती सुलभा श्रीकांत कुलकर्णी- वळीवडे, शिवाजी शामराव पाटील -कोथळी, शामराव तुकाराम भोगम- भोगमवाडी, राजेंद्र अण्णासाहेब पाटील- शिरोली दुमाला, बंडा दत्तू पाटील- खुपिरे, विष्णू पांडुरंग पाटील -कुडित्रे
सहकार कार्यकर्ते मानकरी: श्रीपती बापू पाटील -निगवे खालसा, ज्ञानदेव रामचंद्र देसाई -आरळे, सर्जेराव दिनकर जरग- महे, शिरीष अण्णासाहेब देसाई- पट्टणकोडोली, लहू गोपाळा भाटे- बोलोली, सीमा सर्जेराव चाबूक -सांगरूळ. आदर्श सचिव : मनोज पांडुरंग माने- गणेशवाडी.
यावेळी भोगावतीचे संचालक शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, महेश पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, बी. ए. पाटील, नंदकुमार पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे, मधुकर जांभळे आदी प्रमुखांसह संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते. स्वागत संघाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी केले. प्रास्ताविक संघाचे संस्थापक संचालक विश्वास नारायण पाटील -आबाजी यांनी केले. सूत्रसंचालन एम. पी. पाटील- कावणेकर यांनी केले. आभार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी केले.