मंत्री हसन मुश्रीफ जनतेच्या मनातील नव्हे तर फक्त कागलचे 'पालकमंत्री'
शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची टीका
कोल्हापूर
महायुती सरकारचे पालकमंत्री जाहीर झाले मात्र अंतर्गत धुसपुस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही, कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वाशिमला रवानगी करण्यात आली आहे. यावर मुश्रीफ प्रचंड नाराज झाले आहेत, यातूनच त्यांनी माध्यमांशी बोलताना मी जनतेच्या मनातील पालकमंत्री असल्याचं सांगितलं मात्र मुश्रीफ जनतेच्या मनातील नाही तर फक्त कागलचे पालकमंत्री आहेत अशी घनाघाती टीका शरद पवार राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी केली आहे. भाजपच्या मेहरबानीवर मुश्रीफांना मंत्रीपद मिळालाचही घाटगे यावेळी म्हणाले.
पुढे घाटगे म्हणाले, सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नसताना, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेच्या मनातला मीच पालकमंत्री असे मिडीयाला सांगितले. जिल्ह्यातून महायुतीचे दहा आमदार निवडून आलेले आहेत. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील हरल्यामुळे अजित पवार कमालीचे नाराज आहेत. राजेश पाटील यांना निवडून आणण्याची मुश्रीफ साहेबांची जबाबदारी होती. पण त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नसल्यामुळे त्यांना हे पालकमंत्री पद मिळाले नसल्याचे आमचा कोल्हापूर वासियांचा अंदाज आहे. त्यामुळे प्रयत्न करुनही मुश्रीफ साहेबांना पद मिळाले नसल्याने अजित पवारांच्या मनातून मुश्रीफ साहेब उतरले असावे अशी कोल्हापूरकरांच्यात चर्चा आहे. हसन मुश्रीफ हे यापूर्वी ही पालकमंत्री होते. तेव्हा लोकसभा आणि विधानसभेमुळे मी फार उठावदार काम करु शकलो नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला मुश्रीफ हे कागल पूरतेच मर्यादित आहेत. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे ७ आमदार होते. पण आता मंत्री हसन मुश्रीफ हे एकटेच राष्ट्रवादीचे राहिले आहेत. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी फक्त कागलचा विचार न करता, संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर नक्कीच पुन्हा जिल्ह्याचे पालक मंत्री होती असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी केले.