चिखली कोमुनिदादवर पुन्हा मंत्री गुदिन्हो समर्थकांचा विजय
वास्को : मुरगाव तालुक्यातील चिखली कोमुनिदादची व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठी झालेल्या बैठकीत स्थानिक आमदार व राज्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांच्या समर्थक पॅनेलला सदस्य मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांच्या पॅनेलला बिनविरोध निवडण्यात आले. या पॅनेलला दुसऱ्या कार्यकाळासाठी संधी देण्यात आली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांनी या पॅनेलचे अभिनंदन करताना विरोधी गटाने गैरप्रचार करूनही आपल्या पॅनेलचा विजय हा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावतीच असल्याचे म्हटले आहे.
चिखली कोमुनिदादची नवीन व्यवस्थापकीय समिती काल रविवारी निवडण्यात आली. यासाठी चिखली कोमुनिदाद कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. कोमुनिदादच्या उपस्थित सदस्यांनी मंत्री माविन गुदिन्हो यांच्या समर्थक गटाला आपला पाठींबा दिला. हात उंचवून नव्या समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे विजयी पॅनेलसह मंत्री माविन गुदिन्हो यांनी समाधान व्यक्त केले. विद्यमान समितीलाच कोमुनिदादच्या सदस्यांनी पुन्हा संधी दिलेली आहे.
मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या समर्थक पॅनेलचे अभिनंदन करताना आपल्या काही विरोधकांनी आपला गट पुन्हा निवडून येऊ नये यासाठी बराच गैरप्रचार केला होता. मात्र, त्या प्रचाराला फारसा प्रतिसाद लाभला नाही. सदस्यांनी पुन्हा विद्यमान गटालाच चिखली कोमुनिदाचा कार्यभार सांभाळण्याची संधी दिली. या बैठकीवेळी मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. या गटाने यापूर्वी चांगले काम केले आहे. त्यामुळेच सदस्यांनी त्यांना पुन्हा स्विकारलेले आहे. सदस्यांच्या या निर्णयामुळे नकारार्थी प्रचार करणाऱ्यांचे जनतेत स्थान काय आहे हे उघड झालेले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली. लोकांना चांगली शिकवणूक देण्याचे सोडून काहीजण लोकांना नकारात्मक शिकवण देत असल्याचे व ते समाजासाठी घातक असल्याचे गुदिन्हो म्हणाले.
पुन्हा निवड झालेल्या चिखली कोमुनिदादच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य व पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. अध्यक्ष - सावियो मास्कारेन्हास, अॅटर्नी - मान्युयल डायस, खजिनदार - प्रणव शंखवाळकर, सह अध्यक्ष - रायन मिनेझिस, सह अॅटर्नी - महेंद्र साळकर, सह खजिनदार - सविता ईव्होना डायस. ही व्यवस्थापकीय समिती 2025 ते 2027 पर्यंतच्या काळासाठी निवडण्यात आली आहे.