मंत्री गोविंद गावडे आहेत खोटारडे
माजी जि. पं. सदस्य विनोद नागेशकर यांचा हल्लाबोल
फोंडा : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना 1999 साली मगो पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आपला आणि विनोद नागेशकर यांचा महत्चाचा वाटा आहे, या कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या व्यक्तव्याला माजी जि. पं. सदस्य विनोद नागेशकर यांनी जबरदस्त आक्षेप घेत मंत्री गोविंद गावडे खोटारडे आहेत, असा हल्लाबोल केला आहे. ढवळीकर बंधुंवर टीका करताना विनाकारण आपले नाव आपल्या परवानगीशिवाय घेऊन आपल्याला या वादात ओढलेले आहे. आपण मागील 15 वर्षापासून राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असून ढवळीकर कुटुंबियांवर वैयक्तिक टीका करणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांनी मंत्रीपदाचा शिष्टाचार पाळून खोटारडेपणाचा आधार घेत मतदारांची दिशाभूल करू नये, असे खडे बोल विनोद नागेशकर यांनी फोंडा येथे मगो पक्षाच्या कार्यकर्त्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सुनावले आहे.
काल शुक्रवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मगो पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य दिनेश नाईक, बांदोडयाचे माजी सरपंच सुखानंद कुर्पासकर उपस्थित होते. माशेल येथे कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मगो पक्षाने युतीधर्म पाळावा अन्यथा खुशाल जावे ! मांद्रे व प्रियोळ भाजपा लढविणार, असे विधान केले होते. या विधानानंतर सुरू झालेल्या वाद सुरुच आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी 1999 साली आपल्या आणि विनोद नागेशकर यांच्या पुढाकारामुळेच सुदिन ढवळीकर यांना मगो पक्षाची उमेदवारी मिळाल्याचे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विनोद नागेशकर यांनी दिले आहे.
गावडे लढले होते काँग्रेसतर्फे
देवी महालक्ष्मीचा कौल घेतल्यानंतरच सुदिन ढवळीकर यांनी राजकारणात श्रीगणेशा केलेला आहे. 1999 साली मडकईत भाजपाबरोबर युती तुटल्यामुळे सुदिन ढवळीकर यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी गोविंद गावडे आमच्याबरोबर नव्हते. गोविंद गावडेनी 2007 साली कॉग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविलेली होती, असेही नागेशकर यांनी निदर्शनास आणून दिले. आपले वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासोबत मतभेद आहेत, मात्र कौटुंबिक संबंध कधीच बिघडलेले नाहीत. सुसंस्कृत ढवळीकर कुटुंबियाना अपमानास्पद वागणूक देऊ नये. मंत्रीपदाचा शिष्टाचार गावडेंनी पाळावा. मंत्री गावडे यांनी ढवळीकर बंधुंवर टीका करताना आपल्या परवानगीशिवाय आपले नाव घेतले आहे, असेही नागेशकर म्हणाले. फर्मागुडी येथील गोपाळ गणपती देवस्थानात माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्यानंतर देवस्थानचे अध्यक्षपद मंत्री गोविंद गावडे यांनी घेतले. त्यानंतर कोणालाही विश्वासात न घेता देवळाचे ट्रस्ट स्थापन केले. जेव्हा गोपाळ गणपती परिसरातील सर्व जागा सिद्धार्थ बांदोडकर यांच्या नावाने 1/14 उताऱ्यावर नोंद आहे, तेव्हा असे करणे कितपत योग्य आहे याचेहे आत्मचिंतन मंत्री गोविंद गावडे यांनी करावे, असेही नागेशकर यांनी सूचविले आहे.