मंत्री गावडेंचे मंत्रिपद गेल्यात जमा
आदिवासी संघटनेची आज महत्त्वाची सभा : आज दिवसभर मोठ्या घडामोडींची शक्यता
पणजी : प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक सायंकाळी उशिरा नाशिकहून गोव्यात पोहोचल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी भाजपची वरिष्ठ पातळीवरची बैठक होऊ शकली नाही. त्याचबरोबर वादग्रस्त मंत्री गोविंद गावडे यांच्याबरोबर बैठक होऊ शकलेली नाही. मंत्री गावडे यांचे मंत्रीपद जवळपास गेल्यात जमा असून भाजपला आव्हान देण्यासाठी आदिवासी संघटनेची महत्त्वाची सभा आज शुक्रवारी फर्मागुडी येथे माजी आमदार प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली भरविण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला जातीयतेचे संरक्षण घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी मंत्री गावडे यांना मंत्रिमंडळातून अर्धा चंद्र देण्यास यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंत्रिमंडळाची फेररचना करून त्यातून गावडे यांना वगळण्यात येणार आहे, परंतु या गोष्टीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. आज 30 मे रोजी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे मंत्री गोविंद गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील.
मंत्री गावडे यांचे नाणे खणखणीत नाही आणि त्यांना पाहिजे त्या प्रमाणात खुद्द त्यांच्या मतदारसंघात देखील प्रतिसाद मिळत नाही आणि राजकीय आश्रय मिळत नसल्याने आता आदिवासी संघटनेचा वापर सुरू केला आहे. आदिवासी संघटनेचे नेते प्रकाश वेळीप तसेच अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर मंत्री गोविंद गावडे यांनी कला कादमीच्या आपल्या कार्यालयात दीर्घकाळ बैठक घेतली. संपूर्ण दिवसभर मंत्री गावडे पणजीत होते. आपले मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यात त्यांना कितपत यश आले, हे पुढील दोन दिवसात कळून चुकेल.
प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतील तसेच मंत्री गोविंद गावडे यांच्याशीदेखील चर्चा करतील. गोव्यातील बहुतेक मंडळींनी मंत्री गावडे यांना वगळावे असे गेले वर्षभर प्रयत्न केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यास थंडा प्रतिसाद दिला. आता प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगून मंत्री गावडे यांनी सर्व मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत.
आदिवासी संघटनेचे आव्हान
दरम्यान आज गोव्यात काही राजकीय घडामोडी होऊ शकतात. गावडे यांच्याबरोबरच प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी संघटनेने भाजपला थेट आव्हान दिलेले आहे. मंत्री गावडे यांना हात लावूनच दाखवा, असा इशारा दिलेला आहे. मात्र भाजप आपल्या निर्णयाबाबत ठाम असल्याने भाजपला आव्हान देण्यासाठी आज फर्मागुडी येथे एका सभेचे आयोजन केले आहे आणि त्यात गावडे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन घडविण्याचा इरादा आहे.
भाजपवर परिणाम होत नाही
भाजपकडे आमदार गणेश गावकर तसेच सभापती रमेश तवडकरसारखे दिग्गज नेते असून आदिवासी मोठ्या प्रमाणात या नेत्यांबरोबर आहेत. त्यामुळे कोणीही आव्हान दिले तरी भाजपवर फारसा परिणाम होत नाही, असे पक्षाचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर हे आहेत पर्याय...
- वादग्रस्तमंत्री गोविंद गावडे यांना एक तर राजीनामा देण्यास सांगितले जाईल.
- राजीनामादेण्यास नकार दिला तर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासंदर्भातील शिफारस पत्र मुख्यमंत्री राज्यपालांना पाठवू शकतात.
- मंत्रीगावडे यांना थेट मंत्रिमंडळातून काढू नये यासाठी मुख्यमंत्री साऱ्या मंत्र्यांचे राजीनामे मागून घेतील आणि नव्याने मंत्रिमंडळाची फेररचना करून मंत्र्यांना शपथ देतील.
- मंत्रीगावडे यांना वगळल्यास त्या जागी दिगंबर कामात यांना मंत्रिपद दिल्यास आदिवासी जनतेवर अन्याय होऊ नये यासाठी एक तर रमेश तवडकर किंवा गणेश गावकर यांना मंत्रिपद दिले जाईल.
- दिगंबरकामत यांनी कोणत्याही परिस्थितीत सभापती पद स्वीकारणार नाही असे सांगितले असल्यामुळे नीलेश काब्राल यांना सभापतीपद दिले जाऊ शकते.
- केवळएकाच नव्हे तर दोन मंत्र्यांना वगळून दोन नवे मंत्री घेण्याचा पर्याय खुला आहे.