मंत्री डी. सुधाकर यांची प्रकृती चिंताजनक
आमदार एच. डी. रंगनाथ यांची माहिती : श्वसन विकाराच्या आजाराने फुफ्फुसे खराब
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
योजना आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चार आठवड्यांपासून दिसून येत असलेली लक्षणे गंभीर परिस्थिती दर्शवत आहेत, अशी माहिती कुनिगलचे आमदार आणि डॉक्टर असलेले एच. डी. रंगनाथ यांनी दिली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना, मंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल सार्वजनिक माहिती देणे ही त्यांच्या कुटुंबाची आणि ऊग्णालयातील डॉक्टरांची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे सरकारने काहीही लपवलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिओमुळे मंत्री सुधाकर यांच्या डाव्या पायाला त्रास होता. परिणामी, उजव्या पायावर दाब पडल्यामुळे गुडघ्यातील वेदना वाढत होत्या. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दोन-तीन जणांनी शिफारस केली होती. त्यांनी माझी भेट घेऊन माझा सल्ला विचारला होता. मी त्यांना काही दिवस थांबायला सांगितले. दरम्यान, त्यांनी मणिपाल ऊग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रिया करवून घेतली.
सुऊवातीला दोन दिवस त्यांची प्रकृती ठीक होती. अचानक त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला. सहा तास उलटूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिथे ते पुरेसा ऑक्सिजन घेऊ शकत नसल्याने फुफ्फुसे आणि हृदयाला आधार देणारे ‘इको’ नावाचे कृत्रिम मशीन लावण्यात आले. चार आठवडे उलटूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
श्वसन विकाराच्या (आरडीएस) आजारामुळे त्यांची फुफ्फुसे खराब झाली आहेत. उपचारांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल सार्वजनिक माहिती देण्यासाठी कुटुंबाची परवानगी घ्यावी लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर डॉक्टरांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दलही चर्चा झाली आहे. फुफ्फुस प्रत्यारोपण आता तितके फायदेशीर नाही, कारण त्याचा प्रभाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, असे मत मांडण्यात आले आहे