केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांची कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्र ला भेट
गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
भारत 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन विकासाच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले. सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, पंचायत समिती करवीर व ग्रामपंचायत कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने करवीर तालुक्यातील कणेरी येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री भगवंत खुबा बोलत होते. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी कृषी, नैसर्गिक शेती, जमिनीचे आरोग्य, मृदा आरोग्य पत्रिकांचा उपयोग व इतर विभागाच्या शेतकरी, महिला व युवकांसाठीच्या विविध योजना बद्दल माहिती सांगितली. या योजना गावागावात पोहोचवण्यासाठी विकास रथाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून नागरिकांच्या व लाभार्थींच्या अडचणी व शंका यांचे निरासन ही जागेवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे , गटविकास अधिकारी कुंभार , कणेरी गावचे सरपंच निशांत पाटील व इतर अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवंत खुबा यांनी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन, कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक शेतीच्या प्रक्षेत्रास भेट दिली व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञा सोबत संवाद साधत नैसर्गिक शेतीचे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे मॉडेल कृषी विज्ञान केंद्र द्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवावे असे सुचित केले. याच सोबत त्यांनी मठावरील गोशाळा, लखपती शेती प्रकल्प, गुरुकुल व मठाच्या इतर विविध उपक्रमास भेट दिली.