तळवणे गावाला मायनिंगचा विळखा,नियम धाब्यावर बसवून उत्खनन
उपसरपंच रंजन गावडे यांचा आरोप
न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात तळवणे या गावात सर्व्हे नंबर 11 या ठिकाणी अवैध खनिज उत्खनन सुरु असल्याचा आरोप उपसरपंच रंजन गावडे यांनी केला आहे.तसेच सदर खनिज उत्खननाकरिता काम करीत असलेल्या कंपनीने आपल्या इंडियन ब्युरो आॕफ माइन्स,शाखा कार्यालय,फातोर्डा गोवा कार्यालयाकडून परवाने, मायनिंग प्लॅन,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ रत्नागिरी कार्यालयातील ( consent to operate) परवानगी, (environment clearance) पर्यावरण,महासंचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन नागपूर यांचे परवाने आवश्यक असतात. असे असताना मात्र या मायनिंग प्रकल्पासाठी कोणतेही परवाने न घेता सध्यस्थितीत तळवणे गावात नव्याने सुरु करण्यात आलेले मायनींग उत्खनन हे बेकायदेशीर असुन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला जात आहे अशी माहिती गावडे यांनी दिली आहे.या अवैध उत्खननापासुन तळवणे गावाला कोणताही फायदा नसून उलट गावात प्रदूषण, शेतीचे नुकसान होत आहे.तसेच या मायनिंग प्रकल्पामुळे कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही.तसेच कोणतीही शालेय अथवा आरोग्य विषयक सुविधा सुद्धा आजपर्यंत उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत.शासनस्तरावर तक्रारी केल्यास ढिम्म प्रशासन फक्त मूक गिळून गप्प राहतात. मात्र प्रत्यक्ष कारवाई कोणतीही केली जात नाही. यामागे कोणाच्या आशीर्वादाने एवढी अवैध लूट सुरु आहे.याची त्वरीत उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी मायनिंग कार्यालय नागपूर, रत्नागिरी व गोवा या ठिकाणी निवेदन देवून सर्वसामान्य जनतेसाठी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून सदर मायनिंग उत्खनन प्रकल्प तात्काळ बंद करावा अन्यथा राजरोसपणे सुरु असलेल्या बेकायदेशीर प्रकल्पा विरोधात संपुर्ण तळवणेतील जनतेसह खनिकर्म विभाग ओरोस येथे आंदोलन छेडण्याचा इशारा तळवणे उपसरपंच रंजन गावडे यांनी दिला आहे