ऑक्टोबरपासून खाणकाम सुरू
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : दोन खाण ब्लॉक्ससाठी लवकरच निविदा
पणजी : खनिज लिलावासाठी 15 दिवसांनंतर चौथी निविदा (एनआयटी) जारी करण्यात येणार असून ऑक्टोबरपर्यंत सुरळीत खाणकाम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी विधानसभेत दिली. आमदार एल्टॉन डिकॉस्ता यांनी खाणींचा विषय प्रश्नोत्तर तासाला मांडला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते. खाणी लवकरच सुरू करणार असे सांगून सरकार लोकांची फसवणूक करीत असल्याचे डिकॉस्ता यांनी एका प्रश्नातून निदर्शनास आणले आणि फक्त आश्वासने देण्यात येतात, असा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे सांगितले की, या निविदांतर्गत उत्तर आणि दक्षिण गोव्यात मिळून प्रत्येकी दोन खनिज ब्लॉकचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी जारी करण्यात येणारी ही चौथी निविदा सूचना असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात खाणकाम पुन्हा सुरू करण्यास सरकार वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनऊच्चार केला. खनिज डंप वाहतुकीसह सुरळीत खाणकाम ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू होईल. आतापर्यंत 12 खनिज ब्लॉक्सचा लिलाव झाला असून पैकी तीन ठिकाणी काम सुरूही झाले आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी दोन ब्लॉक सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. 3-4 खनिज लीजधारकांना डंप मायनिंग परवानगी देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सरकार आपल्या मालकीच्या खनिज डंपचे ई-लिलाव करण्याची योजना देखील आखत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.