शिरोलीतील मिनी औद्योगिक वसाहतीतील रस्ता बनला डर्क ट्रॅक, उद्योजक व वाहनधारक त्रस्त
शासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष
पुलाची शिरोली / प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोल्हापूर अँक्सल कंपनीच्या पिछाडीस मिनी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. या वसाहतीत सुमारे दोनशे लहान मोठे उद्योग आहेत. या उद्योगाकडे ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. तोही अरुंद व अपुरा आहे .या रस्त्यावरुन एका वेळी एक वाहन जावू शकते . तेही ड्रट ट्रँकच्या रस्त्यातूनच वाहतूक करावी लागते. या औद्योगिक वसाहतीच्या पश्चिम बाजूला भलेमोठे सिमेंट गोडावून आहे. या गोडावूनला दररोज दहा टनाच्या गाडी पासून चाळीस टनाचे कंटेनर सिमेंट पोती घेवून दिवस रात्र अखंडपणे येतात. तसेच त्या गोडावूनमधून विक्रीसाठी सिमेंट घेवून जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. या अवजड वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. ग्रामपंचायतीने टाकलेल्या मुरुमाचा अक्षरशः चिखल होवून डर्क ट्रॅक झाला आहे.
या दलदलीतून उद्योजक व कामगारांना जीव मुठीत घेवूनच वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे वाहन धारकांच्यातून प्रचंड नाराजी व असंतोष व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत कर थकबाकी लाखांच्या घरात!
या औद्योगिक वसाहतीसाठी रस्ते, पाणी, विज यांची ग्रामपंचातीकडून अद्याप सोय झालेली नाही. त्यामुळे येथील उद्योजकांनी कर भरण्यास असमर्थता दाखवली आहे. हि थकीत रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे.
सिमेंट गोडावून मालकांवर कारवाई का नाही?
याठिकाणी कोल्हापूर येथील एका बड्या व्यक्तीची पाच ते सहा मोठी सिमेंट गोडावून आहेत. या गोडावूनमुळेच येथील रस्ताची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे रिक्षा , टेंपो, कार , मोटारसायकल चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विज वितरणकडून सहकार्य नाही!
या रस्त्याच्या कामामध्ये विद्युत पोल अडथळा ठरत आहे हा पोल काढण्यासाठी विज वितरण कार्यालयाला पत्र व्यवहार केला आहे. पण त्यांच्याकडून अद्याप कसल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे या रस्त्याचे व ड्रेनेजचे काम करण्यास अडचण येत आहे
सौ. पद्मजा करपे, सरपंच.
या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे येथील लहान उद्योगांच्या कामकाजावर होवू लागला आहे. तरी संबंधीतांनी गांभीर्याने दखल घ्यावी.
शरद पाटील, उद्योजक.
प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून आवश्यकत्या उपाययोजना तात्काळ करून वाहतूक सुस्थितीत होण्यासाठी प्रयत्न करू!
ए.वाय कदम. ग्रामविकास अधिकारी.