अमेरिका-चीन यांच्यात खनिज करार
एक वर्षाचा कालावधी, ट्रम्प-जिनपिंग चर्चेचे फलित
वृत्तसंस्था/दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियातील बुसान येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली आहे. ही भेट अत्यंत रोमहर्षक होती, अशी भलावण ट्रम्प यांनी केली आहे. या भेटीत अमेरिका आणि चीन यांच्यात ‘दुर्मिळ खनिजां’संबंधीचा एक वर्षाचा करार झाला असून एक वर्षानंतर या कराराचा कालावधी वाढविण्याचीही तरतूद आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या दुर्मिळ खनिजांवर सध्या चीनचा एकाधिकार आहे. एकटा चीन जगाची या संदर्भातील 80 टक्के आवश्यकता भागवतो. अमेरिकेशी व्यापार शुल्क संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियंत्रण आणले होते. त्यामुळे जगभरातील इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, आता अमेरिका आणि चीन यांच्यात करार झाल्याने ही चिंता दूर झाली आहे.
जगालाही लाभ : चीनची घोषणा
दुर्मिळ खनिजांवरील निर्बंध चीनने केवळ अमेरिकेपुरतेच नव्हे, तर जगातील इतर देशांसाठीही उठविले आहेत. ही घोषणा चीनकडून ट्रंप आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर करण्यात आली आहे. त्यामुळे या खनिजांच्या पुरवठा साखळ्या आता पूर्ववत होण्याची शक्यता बळावली आहे. याचा लाभ इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगाला मोठ्या प्रमाणात होणार असून जागतिक अर्थव्यवस्था स्थिर होणार आहे.
अमेरिकेकडून करांमध्ये कपात
दुर्मिळ खनिजांसंबंधी करार झाल्यानंतर अमेरिकेने चीनवरील कर 10 टक्के कमी केला आहे. त्यामुळे याआधी 57 टक्के असणारा हा कर आता 47 टक्के झाला आहे. ही करसवलत फेटानाईल हे रासायनिक द्रव्य आणि त्याच्याशी संबंधित इतर उत्पादनांसंबंधी देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण अमेरिकेने केले आहे. फेटानाईल द्रव्यासंबंधीचा प्रश्न अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाचे महत्वाचे कारण बनला होता. फेटानाईलपासून घातक अंमली पदार्थही निर्माण करता येतात. त्यामुळे या द्रव्याच्या आयातीवर अमेरिकेने बंधने आणली आहेत. हे द्रव्य अमेरिकेत अवैधरित्या कॅनडा आणि चीनमधून आणण्यात येते, असा अमेरिकेचा आरोप आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी या दोन देशांना इशाराही दिला होता.
अनेक निर्णय
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. व्यापार आणि सहकार्य यांच्या संदर्भात अनेक करार करण्यात येणार आहेत. फेटानाईलपासून बनलेल्या अमली पदार्थांची अमेरिकेला होणारी अवैध निर्यात थांबविण्याचा शक्य तितका सर्व प्रयत्न जिनपिंग करतील, असे ट्रम्प यांनी चर्चेनंतर स्पष्ट केले. अमेरिकेकडून कृषी उत्पादनांची खरेदी करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. अमेरिकेत पिकणारा मका आणि सोयाबिन यांची आयात चीन मोठ्या प्रमाणात करणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देश एकमेकांशी सेमीकंडक्टर्स आणि इतर महत्वाच्या उत्पादनांसंबंधी सहकार्य करणार आहेत. सेमीकंडक्टर किंवा मायक्रोचिप हे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील महत्वाचे साधन आहे, अशीही माहिती देण्यात आली.
‘ब्लॅकवेल’ आणि तैवानसंबंधी चर्चा नाही
अमेरिकेत निर्माण होणाऱ्या अत्याधुनिक ‘ब्लॅकवेल’ चिपसंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, असे नंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ही चिप कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. या चिपचा व्यापार हा या दोन्ही देशांमध्ये मोठ्या वादाचा मुद्दा ठरला होता. तथापि, या मुद्द्याला दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये बगल देण्यात आली आहे. तैवानचा मुद्दाही अत्यंत संवेदनशील आहे. पण त्या विषयावरही कोणतीच चर्चा करण्यात आली नाही. चीन तैवानला आपलाच भाग मानतो. तथापि, तैवानच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व अमेरिकेने स्वत:कडे घेतले आहे. चीनने तैवानचा ताबा घेण्याचा मनोदय अनेकदा बोलून दाखविला आहे. तसेच अनेकदा तैवानच्या कक्षेत आपली विमाने आणि युद्धनौकाही पाठविल्या आहेत.
ट्रम्प चीनचा दौरा करणार...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा दौरा करण्याचे मान्य केले आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा दौरा होणार आहे, अशी घोषणा स्वत: ट्रम्प यांनीच केली आहे. तसेच त्यांच्या दौऱ्यानंतर काही काळाने जिनपिंगही अमेरिकेचा दौरा करणार आहेत. क्षी जिनपिंग हे एका बलाढ्या देशाचे चाणाक्ष नेते आहेत. आम्ही या चर्चेत दोन्ही देशांमधील अनेक मुद्द्यांना अंतिम स्थानापर्यंत आणले आहे. पुढच्या काळात दोन्ही देशांमध्ये सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.