नोकरीवालाच मुलगा हवा ही मानसिकता बदलायला हवी- महापौर मंगेश पवार
बेळगाव : ‘अवाढव्य अपेक्षा न बाळगता तडजोडीची भूमिका घ्यावी, तसेच पॅकेजपेक्षा मुलांचे योग्य गुण पहा’ असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) येथे आयोजित वधू-वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महापौर मंगेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कै. नारायणराव जाधव यांच्या फोटोचे पूजन अमर अकनोजी यांनी केले. शिवराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ईश्वर लगाडे यांनी वधू-वर मंडळाचा आढावा घेतला. ‘मराठा समाजातील लग्ने वेळेवर लावा व मुला-मुलींची पत्रिका बघण्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व बघा’ असे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महापौर मंगेश पवार यांनी सांगितले. यावेळी के. एल. मजुकर व कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड, बेंगळूर, बेळगाव शहर व परिसरातील वधू-वर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ बांडगी, प्रकाश गडकरी, संदीप मुतगेकर, सुनील लगाडे यांनी परिश्रम घेतले.