For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योग्याचे मन केवळ आत्मस्वरूपाचा विचार करत असते

06:49 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
योग्याचे मन केवळ आत्मस्वरूपाचा विचार करत असते
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, आत्मसुखाचा आनंद घेणाऱ्यांना मोक्ष मिळतो. हे आत्मसुख आपल्या अंतरात जरी असले तरी त्याचा शोध लागण्यासाठी योग्याची पूर्वीची पापे नष्ट व्हायला हवीत, मनात कोणत्याही शंका नसाव्यात, मन ताब्यात हवे, सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटायला हवे, त्यांच्या हिताची कळकळ लागून त्यादिशेने कार्य चालू असायला हवे. आत्मसुख प्राप्त झालेल्या योग्याला आपणच शुद्ध आत्मज्ञान आहोत आणि आपल्याच देहामध्ये परब्रह्म आहे हे लक्षात येते. संपूर्ण निरिच्छ आणि नि:शंक झालेले अतिशय श्रेष्ठ योगी आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याचे अधिकारी असतात. निरिच्छ झालेले, काम व क्रोध यांनी विरहित असलेले, मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती या देहातच ब्रह्मरूप होतात. ह्याप्रमाणे देहात असतानाच ब्रह्मरूप होणे हेच साधकाचे साध्य असते. ह्या अर्थाचा

काम-क्रोधास जिंकूनि यत्ने चित्तास बांधिती । देखती ब्रम्ह-निर्वाण आत्म-ज्ञानी चहूंकडे ।।26।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार सर्वसामान्य माणसाला विषयसुखाचे अतिशय आकर्षण असल्याने त्याचे चित्त विषयांच्या उपभोगासाठी वेडे झालेले असते. त्याउलट योग्यांनी आत्मसुखाची चव चाखली असल्याने त्यांनी त्यांच्या चित्ताला विषयांच्या तावडीतून सोडवून स्वत:च्या स्वाधीन करून ठेवलेले असते. त्यामुळे त्यांचे चित्त त्यांना हव्या असलेल्या बाबीवरच चिंतन करत असते. ते ब्रह्मस्वरूप झाल्यावर पुन्हा मूळ स्वभावावर येत नाहीत. येथे वाल्या कोळ्याचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्याचा मूळ व्यवसाय माणसांची हत्या करून त्यांच्या चीजवस्तू लुटण्याचा होता परंतु त्याला नारदमुनींनी उपदेश केल्यावर त्याने रामनाम घ्यायला सुरवात केली. त्यात तो इतका तल्लीन झाला की, त्याच्या मूळ स्वभावात अमुलाग्र बदल होऊन त्याचे वाल्मिकी ऋषित रुपांतर झाले. त्यांच्यातील आत्मज्ञान प्रकट झाल्याने रामायण लिहिण्याएव्हढ्या योग्यतेस ते चढले. मागील श्लोकात आत्मस्वरुपात रुपांतरीत झालेल्या ऋषींचा उल्लेख केलेला आहे त्याला वाल्मिकी ऋषींचे उदाहरण चपखल बसते. एकदा आत्मस्वरूपी लीन झाल्यावर त्यांना पुन्हा आपल्या मूळ स्वभावाची आठवणसुद्धा झाली नाही.

देहधारी असतांनाच त्यांना ब्रह्मभाव कसा प्राप्त होतो ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणाले, ब्रह्मभाव प्राप्त होण्यासाठी योगी बाह्य विषयांना दूर करून, दोन भुवयांमध्ये दृष्टि ठेऊन, नासिकेमध्ये असलेल्या प्राण व अपान यांना समान करतो.

विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू-संगमी स्थिर । करूनि नासिका-स्थानी प्राणापान हि सारखे ।। 27 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जेव्हा योग्याला अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असे वाटत नाही त्यावेळी त्याला पूर्ण वैराग्य प्राप्त झालेले असते. त्याला कोणत्याच इच्छा होत नसल्यामुळे त्याच्या अंत:करणातील विषयवासना बाहेर पडलेली असते. त्याचे मन अंतर्मुख होऊन केवळ आत्मस्वरूपाचा विचार करत असते. आपले मन हे अंत:करणाचा एक भाग असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.