For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगसामर्थ्यापुढे मनाचे काही एक चालत नाही

06:30 AM Jun 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
योगसामर्थ्यापुढे मनाचे काही एक चालत नाही
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

भगवंत म्हणाले, मनावर संयमाने काबू मिळवता येतो. त्यासाठी अष्टांग योगाचा सराव करावा. म्हणजे वैराग्य आणि अभ्यास ह्यांच्या जोरावर मन स्थिर करायची युक्ती साधेल. म्हणून मनाचा निग्रह होण्यासाठी अष्टांग योगाचा सराव करायला आरंभ करावा. आतापर्यंत कित्येक साधकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यात ते सफल झाले आहेत. लोकांना प्रयत्न न करताच मनावर काबू मिळावा असे वाटते. हे कसे शक्य होईल? म्हणून ज्याला हे शक्य होत नाही त्याला मनापासून अभ्यास करावा असे वाटत नाही हेच खरे. ज्याने योगाभ्यास सुरु केला आहे आणि निष्ठेने त्यात तो पुढे जातो त्याच्या अंगात योगाचे सामर्थ्य येऊ लागते.

ह्या योगसामर्थ्याची ताकद एव्हढी मोठी असते की, त्यापुढे मनाचे सामर्थ्य पालापाचोळ्यासारखे ठरते. योगसामर्थ्यापुढे टिकाव न लागल्याने त्याची चंचलता नष्ट होऊन ते निमूटपणे एकाजागी स्थिर होते. अशा योग्याला परिस्थितीवर ताबा मिळवण्याची शक्ती प्राप्त होऊन महतत्वादी सर्व त्याच्या स्वाधीन होते.

Advertisement

जर शास्त्रशुद्ध पद्धतीने, चिकाटीने योगाभ्यास केला तर यश निश्चित मिळते. हे लक्षात न घेणाऱ्या लोकांना मुळातच अभ्यास करायचा कंटाळा असतो त्यामुळे त्यांचे मन स्थिर होत नाही. भगवंतांच्या सांगण्याचा मतितार्थ अर्जुनाच्या ध्यानात आला आणि त्याचबरोबर हेही लक्षात आले की, आत्मविद्या मिळवण्यासाठी दीर्घकाळ तपश्चर्या करणे आवश्यक आहे. पुढे अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, समजा एखाद्याने श्रद्धेने योगाभ्यास सुरु तर केला पण काही कारणाने त्यात खंड पडला तर त्याचे पुढे काय होत असेल? त्याला कोणती गती मिळत असेल? म्हणून त्याने भगवंतांना विचारले,

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो । मुकला योग-सिद्धीस जाय कोण्या गतीस तो ।। 37 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन भगवंतांना म्हणाला, देवा तुम्ही म्हणताय ते मला पटले. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही. योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे, त्याचा फायदा काय होतो ह्याची इतके दिवस मला वार्ताही नव्हती. म्हणून मी म्हणत होतो की, हे मन अनावर आहे. कृष्णा, ह्या जन्मी तुझ्या प्रसादाने योगाची ओळख झाली परंतु मला आणखी एक शंका विचारायची आहे. ती अशी की, जर एखाद्याला मोक्षपद मिळवायची इच्छा आहे पण सगळ्यांना तुझ्यासारखे सद्गुरु मिळणे मुश्कील असल्याने, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटीची माहिती मिळेलच असे नाही.

तरीपण त्याने केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्याने आत्मसिद्धी मिळवण्यासाठी देहसुखाचा म्हणजे विषयसुखाचा त्याग करून योगाभ्यासाबद्दल जी काही अर्धवट, अपुरी माहिती मिळाली असेल त्याच्या आधारे श्रद्धेने योगाभ्यास सुरु केला तरी अपुऱ्या माहितीमुळे त्याचा योगाभ्यास पूर्ण होणे कठीण! मग त्याने केलेल्या योगाभ्यासाच्या प्रयत्नाचे त्याला कोणते फळ मिळते? की त्याने केलेला योगाभ्यास फुकट जाऊन ना धड सांसारिक सुख आणि ना योगप्राप्ती अशी त्याची अवस्था होते?

(क्रमश:)

Advertisement
Tags :

.