कारवार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर लाखो पर्यटक दाखल : हॉटेल्स हाऊसफुल्ल
कारवार : चालू वर्षाला निरोप देण्याचा आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कारवार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध मुर्डेश्वर, दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराणप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण येथे पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. गोकर्ण येथील मुख्य समुद्रकिनारा, गोकर्णपासून काही अंतरावरील ओम बीच, हाफमुन बीच, कुडलेबीचना पर्यटकांच्या उपस्थितीमुळे यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गोकर्णसह परिसरात अनेक रिझार्ट्स, हॉटेल्स, होम स्टे आहेत. तथापि, गोकर्ण येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या इतकी मोठी आहे की, गोकर्णसह परिसरातील निवासी व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे गोकर्ण येथे दाखल झालेले पर्यटक निवासासाठी अंकोला, कुमठ्याकडे धाव घेत आहेत. गोकर्णसह परिसरात केवळ भारतीय पर्यटकच नव्हे तर शेकडो विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. मुर्डेश्वर येथे तर अक्षरश: पर्यटकांचा महापूर लोटला आहे.
दांडेली-जोयडा तालुक्यातील होमस्टे हाऊसफुल्ल
अलिकडच्या काळात दांडेली आणि जोयडा तालुक्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या दोन तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये आयटी क्षेत्रातील आणि औद्योगिक क्षेत्रातील पर्यटकांची संख्या अधिक असते. दोन्ही तालुक्यात पर्यटकांचे मोठ्या संख्येने आगमन झाल्याने येथील होमस्टे समोर हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत.
वास्तव्य कारवारात अन् पर्यटन गोव्यात
पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखल्या जणाऱ्या गोव्याच्या सीमेवर कारवार शहर वसलेले आहे.गोव्यात दाखल होणाऱ्या काही पर्यटकांना हॉटेल्स मिळत नाहीत. हॉटेल्स मिळाले तरी लॉजचे दर परवडत नाहीत. अशा परिस्थितीत काही पर्यटक वास्तव्य कारवारमधील लॉजिंगमध्ये करतात आणि पर्यटन गोव्यात करतात. त्यामुळे येथील लॉजिंगसमोर हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत.
प्रशासनाकडून पर्यटकांना सूचना
कारवार जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नवीन वर्ष साजरे करताना खबरदारी घेण्याच्या कडक सूचना केल्या आहेत. बुधवार दि. 31 रोजी संध्याकाळी 6 नंतर कोणीही समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. दि. 31 रोजी रात्री 12.30 नंतर कोणीही समुद्र किनाऱ्यावर दाखल होऊ नये. साडेबाराच्या आत नागरिकांनी, पर्यटकांनी आपल्या घरी, होमस्टे, हॉटेल्स, लॉजवर परतावे. तसेच समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन केले आहे.