जिल्ह्यातील लाखो शेतकरी डिजिटल!
फार्मर आयडी तयार, शासकीय योजनांचा लाभ होणार सुलभ
बेळगाव : सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला अॅग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून युनिक फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यात 80 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. शेतकरी आता डिजिटल झाले असून या योजनेमुळे शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होणार आहे. शासकीय योजनांचा लाभ अधिक जलदगतीने पोहोचविण्यासाठी अॅग्रिस्टॅक ही संकल्पना आणली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जात आहे. प्रत्येक नागरिकांचा वेगळा आधार आयडी क्रमांक आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शेतकऱ्यांचा एक युनिक फार्मर आयडी तयार केला जात आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या युनिकफार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकार्डला जोडण्याची (लिंक करण्याची) मोहीम सुरू केली आहे. विशेषत: भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे फार्मर आयडी महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा, नुकसान भरपाई, शेती विषयक सर्वेक्षण आदींसाठी ही फार्मर आयडी आवश्यक आहे. अॅग्रिस्टॅक ही डिजिटल पायाभूत सुविधा असून सरकारद्वारे विकसित केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची माहिती आणि शेतजमिनीची नोंदणी करणे तसेच कृषी क्षेत्रातील विविध भागधारकांना एकत्र आणणे हा आहे. या फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची जमीन कोठे आहे, कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत. शिवाय रब्बी आणि खरिप हंगामात शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत. त्याची माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहेत.
फार्मर आयडी महत्त्वाची ठरेल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची युनिक फार्मर आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शासकीय सुविधा पुरविणे सोयीस्कर होणार आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांची माहिती एका क्लिकवरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी महत्त्वाची ठरणार आहे.
- एच. बी. कोंगवाड (उपनिर्देशक कृषी खाते)