चेहरा ‘विकून’ लक्षाधीश, पण...
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआयची धूम आहे. या तंत्रज्ञानाने कोणत्या करामती करता येतात, हे झपाट्याने स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानासंबंधी एकाचवेळी उत्सुकता, भीती, आश्चर्य आणि उद्वेग अशा विविध भावना सर्वसामान्यांमध्ये उमटू लागल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे मानवावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार का, तसेच यामुळे मानवाची सृजनशीलता मारली जाणार का, आहे मुख्य प्रश्न उपस्थित झाले असून त्यांच्यावर गांभीर्याने बोलले जात आहे.
सध्या अमेरिकेतील ल्यूसी नामक एका महिलेला यासंबंधी आलेला अनुभव चर्चिला जात आहे. या महिलेला एका एआय कंपनीकडून संदेश मिळाला. या कंपनीला तिचा चेहरा ‘विकत’ घ्यायचा होता. त्यासाठी मोठी रक्कम देण्यास कंपनी सज्ज होती. या महिलेला प्रथम या ऑफरचे गांभीर्य जाणवले नाही. तिने आपल्या चेहऱ्याची छायाचित्रे पाठविली. तिला एआय मॉडेल बनविले जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले होते. तिच्या चेहऱ्यासाठी कंपनीने तिला 1 लाख 65 हजार रुपये दिले. मात्र, कंपनीने तिच्याकडून एक करार करुन घेतला. त्यानुसार तिचा चेहरा त्यापुढच्या अनेक जाहिरातींमध्ये उपयोगात आणला जणार होता. हा पैसा कमावण्याचा सोपा मार्ग आहे, असे या महिलेला वाटल्याने तिने करारावर स्वाक्षरी केली. मात्र, लवकरच आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. कंपनीने तिच्या चेहऱ्याच्या अनेक जाहीरातींमध्ये उपयोग केला पण तिला आवश्यक ते मानधन दिलेच नाही. या प्रत्येक जाहिरातीत तिने स्वतंत्ररित्या मॉडेलिंग केले असते, तर तिला प्रत्येक जाहीरातीचे वेगळे पैसे मिळाले असते. तथापि, ही एआय कंपनी तिच्या चेहऱ्यामध्ये या तंत्रज्ञानाचा साहाय्याने परिवर्तन करुन तो वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये दाखविण्यास प्रारंभ केला आहे. तिला पैसे मात्र एकदाच मिळाले आहेत. आता ही महिला इतरांची अशी फसवणूक होऊ नये, म्हणून जनजागृती करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीशी करार करताना प्रत्येकाने कायदेतज्ञाशी चर्चा करुनच पुढचे पाऊल टाकावे, अशी या महिलेची सर्वांना सूचना आहे.