बॉलिवूडमध्ये काम करू इच्छिते मिली बॉबी ब्राउन
हॉलिवूड अभिनेत्री मिली बॉबी ब्राउन सध्या ‘एनोला होम्स 3’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा प्रसिद्ध युवा डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसून आली आहे. या चित्रपटात अॅक्शन, रोमान्स, ड्रामा आणि कॉमेडी सर्वकाही आहे, याचमुळे ती हिंदी चित्रपटांसाठी देखील परफेक्ट असल्याचे मिलीला वाटते.
बॉलिवूडपटासाठी मी कधीच नकार देणार नाही. भारत माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. मी तेथे जाऊ इच्छिते, मी काहीही करण्यास तयार आहे, खासकरून कॉमेडी. हिंदी चित्रपटांमधील नृत्य मला अत्यंत पसंत असल्याचे तिने म्हटले आहे. मिलीने अत्यंत कमी वयातच अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती आणि तिला खरी ओळख नेटफ्लिक्सचा शो ‘स्ट्रेंजर थिंग्स’मुळे मिळाली. यात तिने ‘इलेवन’ ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे ती जगभरात लोकप्रिय झाली आहे. याचबरोबर ‘गॉडजिला :किंग ऑफ द मॉन्स्टर्स’ आणि ‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ या चित्रपटांमध्येही ती दिसून आली आहे. यानंतर तिने ‘एनोला होम्स’मध्ये मुख्य भूमिका साकारली आणि या चित्रपटाची निर्माती देखील झाली.