For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्यदायी नाचणी आईस्क्रिम, शंकूही पोहोचलेय राष्ट्रीय स्पर्धेत...!

04:42 PM Feb 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
आरोग्यदायी नाचणी आईस्क्रिम  शंकूही पोहोचलेय राष्ट्रीय स्पर्धेत
Advertisement

कमला कॉलेजमधील सिमिन बागवानचे संशोधन; जिल्हा, विद्यापीठ, राज्यस्तर ‘आविष्कार’मध्ये यश

अहिल्या परकाळे कोल्हापूर

राज्यात 2023 हे वर्ष मिलेट अर्थात भरड धान्य वर्ष म्हणून साजरे झाले. आहारात मिलेटला असलेले महत्व पटवून देण्यासाठी देशभरातील विद्यापीठांसह अन्य संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले गेले. यातील एक प्रयोग कमला कॉलेजमधील सिमिन बागवानचा.. तिने नाचणीपासून आईस्क्रिम बनवले. हे आईस्क्रिम बनवताना संशोधनाअंती नाचणीपासून आईस्क्रिम (फ्रोझन डेझर्ट) आणि त्यासाठीचा कोन तयार केला. या आईस्क्रिमच्या माध्यमातूनही मिलेटसारखे पौष्टिक अन्न मुलांना देऊ शकतो, हे तिने दाखवून दिले. जिल्हा, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत यशस्वी होत तिचे संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील अविष्कार स्पर्धेसाठी निवडले गेले आहे.

Advertisement

कमला कॉलेजमधील बीहोक फुड टेक्नॉलॉजी अॅंड प्रोसेसिंगच्या व्दितीय वर्षात सिमिन बागवान शिकत आहे. बाजारातील आईस्क्रिमचा शंकू आरोग्यासाठी घातक असतो. या कोनामध्ये साखर, हायड्रोजन, फॅटचे प्रमाण अधिक असते. परिणामी कोलेस्टेरॉल वाढणे, ह्रदयविकार व इतर रोग उद्भवतात. मैद्यापासून बनवलेल्या शंकूमध्ये ग्लूटेन आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असते. यांचा अभ्यास करून सिमिन हिने नाचणीपासून आईस्क्रिम (फ्रोझन डेझर्ट) आणि त्यासाठीचा कोन तयार केला.

पण हा आईस्क्रिम आणि कोनासाठी तिने साखरेऐवजी गुळ वापरला. नाचणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि आयर्न जास्त असते. ग्लूटेन आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. आईस्क्रिम (फ्रोझन डेझर्ट) आणि त्यासाठीचा कोनही पौष्टिक असल्याने शरीराला गारवा मिळतो. कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. आईस्क्रिम आणि त्यासाठीचा कोन बनवण्यासाठी फक्त साडेपाच रूपये खर्च येतो. त्यामुळे मुलांना आवडणारे आईस्क्रिम पौष्टिक व कमी किंमतीत मिळणार आहे.

Advertisement

जगभरात 15 बिलियन लिटर आईस्क्रिम दरवर्षी खाल्ले जाते. परंतु दुध, मैदा आणि साखरेपासून बनवलेले आईस्क्रिम शरीराला अपायकारक असते. हे माहिती असूनही लोक आवडीने ते खातात. केंद्र सरकारने 2023 मिलेट वर्ष म्हणून जाहीर केले. त्यामुळे मिलेटपासून इतरांपेक्षा वेगळी व सर्वांना आवडेल अशी डीश म्हणून नाचणीपासून आईस्क्रिम व कोन तयार केला. कारण नाचणीचे दूध तयार करता येते. गोडीसाठी पौष्टिक कॅल्शियमयुक्त गुळाचा वापर केला आहे. या आईस्क्रिमचे गुणधर्म पाहून जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आणि शिवाजी विद्यापीठ पातळीवरील आविष्कार स्पर्धेत या संशोधनाने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय आविष्कार स्पर्धेत टॉप टेंव्टींमध्ये या आईस्क्रिमची निवड झाली आहे.

नाचणीचे गुणधर्म
नाचणीचे पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियम भरपूर असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील साखरेची पातळी कमी करते. पचनक्रिया चांगली राहते. अशक्तपणा दूर होतो. कंबरदुखी, अंगदुखीचा त्रास कमी होतो. पौष्टिक नाचणीचा इतरांपेक्षा वेगळा पदार्थ तयार करण्यासाठी वापर केला आहे.

स्टार्टअप व पेटंट करण्याचा मानस
शिवाजी विद्यापीठांतर्गत स्टार्टअपसाठी नोंद करून त्यावर पेटंट मिळवण्याचा मानस आहे. या आईस्क्रिमची किंमत बाजारातील आईस्क्रिमपेक्षा कमी असणार आहे. या संशोधनासाठी मार्गदर्शक अभिनव गाताडे, जेबा मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले.
सिमिन बागवान (विद्यार्थिनी, कमला कॉलेज)

Advertisement
Tags :

.