kolhapur : डिबेंचर'कपातीवरून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळवर धडक मोर्चा ; आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट
गोकुळ दूध कपात निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा जनावरांसह धडक मोर्चा
कोल्हापूर : राज्यातील आघाडीच्या संस्थांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे दिवाळीपूर्वी जाहीर झालेल्या फरक रकमेच्या वितरणावरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. संघाने या वर्षी दूध उत्पादकांना 136 कोटी रुपयांचा फरक जाहीर केला असला, तरी त्यातील सुमारे 74 कोटी रुपये ‘डिबेंचर’ स्वरूपात रोखून ठेवल्याने शेतकरी आणि दूध संस्था चालकांमध्ये असंतोष उसळला आहे. या निर्णयाविरोधात गुरुवारी हजारो दूध उत्पादकांनी जनावरांसह “जवाब दो” मोर्चा काढत गोकुळच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली.
हा अनोखा मोर्चा शासकीय विश्रामगृहातून निघून ताराबाई पार्क येथील संघाच्या मुख्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी आणल्याने पोलिसांना त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागले. तर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच दूध उत्पादकांनी कार्यालयासमोर जनावरे बांधून निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबला.
डिबेंचर कपातीवर संताप..
गोकुळ दूध संघाने उत्पादकांना देण्यात येणाऱ्या डिबेंचर रकमेतील 40 टक्क्यांहून अधिक कपात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे दूध उत्पादकांच्या हातातील फरक रक्कम लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही कपात सरासरी 15 टक्क्यांपर्यंत होती, परंतु यंदा ती अधिक असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.
जनावरे घेऊन मोर्चा..
शेतकऱ्यांनी आपल्या गायी-म्हशींसह गोकुळच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला. शासकीय विश्रामगृहापासून सुरु झालेला हा मोर्चा कार्यालयापर्यंत पोहोचला. जनावरांना कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी अडवला. परिणामी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी थेट कार्यालयात धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या..
मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले की, हा मोर्चा गोकुळ संस्थेच्या विरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. डिबेंचर स्वरूपात कपात केलेली रक्कम तातडीने परत मिळवावी, अशी मुख्य मागणी त्यांनी केली. तसेच योग्य ती फरक रक्कम न देता कपात करत असल्यास दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचा निवेदन गोकुळ प्रशासनाला दिले आहे.
प्रशासनाची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल
गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले की, गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ परदेशातून परतल्यानंतर तातडीची संचालक मंडळ बैठक घेऊन या कपातीचा मुद्दा गंभीरपणे विचारात घेतला जाईल. दिवाळीच्या आधी सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न होणार असून, शेतकऱ्यांना समाधानकारक गिफ्ट दिवाळीच्या मुहूर्तावर मिळेल.
दरम्यान या आंदोलनातून गोकुळमधील राजकीय संघर्षही उफाळून आला असून, सत्ताधारी आणि विरोधी गट यांच्यात तणाव वाढल्याचे दिसून आले. मोर्चात जय श्रीराम आणि शौमिका महाडिक यांच्या विजयाच्या घोषणाही पाहायला मिळाल्या. दरम्यान या मोर्चानंतर आता नेमका काय निर्णय गोकुळ प्रशासन घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.