राज्यातील जनतेला दूध दरवाढीचा शॉक
प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती
बेंगळूर : राज्यात दुधाच्या दरात वाढ करून सरकारने जनतेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यास सहमती दर्शविण्यात आली आहे. दूध संघ आणि शेतकऱ्यांकडून दूध दरात वाढ करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रतिलिटर दुधाच्या दरात पाच ऊपयांनी वाढ करावी, अशी मागणी युनियनने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 ऊ. वाढ करण्यास सहमती दर्शविली. सुधारित दर 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी सांगितले.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना, नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 ऊपयांनी वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सुधारित दर लागू होणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आमच्या राज्यात दुधाचा दर कमी आहे. राज्यात नंदिनी दुधाचा दर प्रतिलिटर 42 ऊपये आहे. आसाममध्ये खरेदी-विक्रीच्या दरात 27 रुपयांचा फरक आहे. केरळ, गुजरात, दिल्ली, तेलंगणात दुधाचे दर अधिक आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आमचा दर कमी आहे. शेतकऱ्यांनी दरवाढीची मागणी केल्याचे सांगत मंत्र्यांनी दूध दरवाढीचे समर्थन केले.
शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे दरात वाढ करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेनेही दरवाढीसाठी दबाव आणला होता. प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली असून हा दर शेतकऱ्यांना सरसकट देण्यात येणार आहे. गायी आणि पशुपालनाच्या देखभाल खर्चात वाढ झाल्यामुळे दूध दरात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत होती. या मागणीचा आढावा घेत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून दरवाढीला अंतिम स्वरुप देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.