मिल्ट्री अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार
सातारा :
अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला हवी यासाठी सातारा जिह्यातील मिल्ट्री अपशिंगे येथे युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) उभारणार असल्याची घोषणा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे व्हॅलेंट फेम आयकॉन या संस्थेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘पराक्रम दिवस‘ या आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
यावेळी आमदार महेश सावंत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोस, माजी आमदार सुनील शिंदे, सेवानिवृत्त मेजर प्रांजल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे मनोज सानप, व्हॅलेंट फेम आयकॉन या संस्थेच्या अध्यक्ष अंजली साखरे, संतोष साखरे यावेळी उपस्थित होते. यावेळी भारतीय नौदल, लष्कर, वायुदल, एनसीसी, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यामधील कार्यरत असलेल्या 32 विविध अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सातारा जिह्यातील मिल्ट्रि अपशिंगे हे गाव असे आहे की तिथे प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती वेगवेगळ्या सैन्य दलात आहे. माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर या गावाला मी प्रथम भेट दिली. या गावात भेट देऊन सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सैन्य दलात असणाऱ्या सैनिकांचे अतुलनीय शौर्य नव्या पिढीला माहिती हवी यासाठी राज्यात वॉर मेमोरियल उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राज्य शासन देखील राबवत आहे. निवृत्त सैनिक अधिकारी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या कामाची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी प्रत्येक तालुका मध्ये माजी सैनिकांचे प्रबोधनपर व्याख्यान देखील आयोजित करण्याचा विभागाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री देसाई म्हणाले की, कोणत्याही सैन्यातील सैनिकांना असलेली शिस्त ही आयुष्यभर त्यांच्या अंगी दिसते. नव्या पिढीला देखील ही शिस्त माहिती होणे गरजेचे आहे. फक्त सैन्य दलात असल्यानंतरच शिस्त असणे महत्त्वाचे आहे असे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक जीवनाला शिस्त असली पाहिजे. निवृत्त झालेला सैनिक हा त्याच्या करारीपणामुळे ओळखू येतो. श्री. व सौ. साखरे यांनी सैन्य दल त्याचबरोबर इतर क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा केलेला सत्कार कार्यक्रम हा अभिमानास्पद आहे. अशाप्रकारे केलेल्या कार्यक्रमामुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.