दापोलीत आढळला स्थलांतरित मास्क बुबी
दापोली / मनोज पवार :
क्वचित भारताच्या किनाऱ्यावर येणारा मास्क बुबी पक्षी तालुक्यातील आंजर्ले गावालगत असणाऱ्या मुर्डी येथे आढळून आला आहे. त्याला सुरक्षितरित्या पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. समुद्री पाहुणा मुखवटाधारी बुबी पक्षी मुर्डी परिसरात सापडल्याची नोंद झाली आहे.
शनिवारी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा, बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेला आणि अडचणीत आढळून आला. त्यांनी तत्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली. ही माहिती मिळताच वनविभाग आणि सर्पमित्र व निसर्गप्रेमी मनित बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पक्ष्याची शारीरिक अवस्था तपासली असता तो फारच थकलेला, पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अशा अवस्थेत आढळून आला. हा पक्षी नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचितच पश्चिम किनारपट्टीवर दिसतो.
पक्ष्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तिथे त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणीनंतर संध्याकाळी वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर व दापोली वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आंजर्लेतील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरित्या सोडण्यात आले.
- परदेशात कुठे आढळतो ?
हा एक परदेशी समुद्री पक्षी आहे जो सामान्यतः हिंद, प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दुर्गम बेटांवर आढळतो. भारतात तो स्थलांतरित म्हणून कधी कधी दिसतो. विशेषतः वादळानंतर, थकवा, किंवा अन्नाच्या शोधामुळे चुकून किनाऱ्यावर पोहोचतो. पाकिस्तानची किनारपट्टी, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा अंदमान निकोबार भागात हा आढळून आल्याच्या नोंदी आहेत. हा पक्षी, समुद्रात राहणारा एक मोठा पक्षी आहे. तो सुलीडे (Sulidae) कुटुंबातील असून त्याची ओळख त्याच्या मोठ्या आकाराने, लांब चोचीने आणि जलतरणासाठी योग्य असलेल्या शरीराने होते. बुबी पक्षी, विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. या बुबी पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. लाल-पायाचा बुबी, मुखवटा घातलेला बुबी आणि राखाडी बुबी अशा अनेक प्रजाती आहेत.
बुबी पक्ष्यांचे शरीर लांब आणि सिगारच्या आकाराचे असते, तसेच त्यांचे पंख लांब, अरुंद आणि टोकदार असतात. त्यांचे मुख्य अन्न म्हणजे विविध प्रकारचे मासे आणि समुद्रातील लहान जीव आहेत. बुबी पक्षी उडण्यात वाकबगार असून ते पाण्याच्या पृष्ठभागावरून वेगाने झेपावून पाण्यात शिकार करतात. ते अनेकदा मोठ्या थव्याने राहतात आणि घरटी देखील मोठ्या वसाहतींमध्ये बनवतात.
भारतातामध्ये हा पक्षी विणीनंतर पाकिस्तानच्या किनार पट्टीवर, तसेच वर्षा ऋतूतील वादळातून भारताचा पश्चिम किनारा आणि श्रीलंकेपर्यंत येतात तसेच मालदीव बेटावरही आढळतात. काही बुबी प्रजाती धोक्यात आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे महत्वाचे असल्याने यांना दुर्मीळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.