तरुणीवर अत्याचारप्रकरणी परप्रांतीय मजूरास ४ दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी
तालुक्यातील एका गावात तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल असलेला मुख्य संशयित आरोपी थॉमस बा (22) रा. लसिया, झारखंड या परप्रांतीय मजूराला गोवा येथून सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने शनिवार ४ ऑक्टोबर रोजी रात्री ताब्यात घेतले. रविवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सौ जे. एम .मिस्त्री यांनी संशयिताला बुधवार,8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता गणेश पाटोळे यांनी काम पाहिले. तर या प्रकरणात मुख्य संशयित आरोपीला सहकार्य करणारा अन्य एक संशयित मजूर फरार असून त्याचा सावंतवाडी पोलीस शोध घेत आहेत. या घटनेबाबत काल तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अत्याचार प्रकरणी दोघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी काही तासातच मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून एक अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.