कुपवाड एमआयडीसीत परप्रांतीय कामगाराचा खून
किरकोळ वादातून कृत्य; दोघांना अटक
कुपवाड
कुपवाड एमआयडीसीतील लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुण कामगाराचा डोक्यात दांडक्याने वर्मी घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. रात्री एकत्र बसून जेवण करताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चिडून दोघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या खूनच्या घटनेने कुपवाड एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली आहे. इद्रीस गौरीशंकर यादव (वय 23, शाहूपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा.लक्ष्मी इंडस्ट्रीज, कुपवाड एमआयडीसी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित वैभव सहदेव कांबळे (वय 21) व चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत (वय 22, दोघेही रा.लक्ष्मी इंडस्ट्रीज, कुपवाड एमआयडीसी. मूळ रा.सलगरे) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दांडके जप्त केले आहे. गुरूवारी दोघांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुपवाड एमआयडीसीत लक्ष्मी इंडस्ट्रीज कारखान्यात गेल्या पंधरा दिवसांपासून खाजगी ठेकेदारामार्फत फॅब्रिकेशनचे काम सुरू आहे. या कामासाठी इद्रिस यादव काही दिवसांपूर्वी एका ठेकेदारामार्फत आला होता. इद्रीस यादव यासह संशयित वैभव कांबळे, चिदानंद खोत व अजयकुमार पटेल हे चौघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यांचा मुख्य ठेकेदार दिलीप राऊत असून सब ठेकेदार दिगंबर भरत कांबळे यांच्यामार्फत ते कामाला होते. संबंधित ठेकेदाराने कारखान्यात चौघांना राहण्यासाठी दोन खोल्यांची व्यवस्था केली होती. येथे चौघेही एकत्र जेवण बनवत होते.
मंगळवारी रात्री इद्रिस यादव, वैभव कांबळे व चिदानंद खोत यांच्यात ‘जेवण उशिरा का बनवले, चपात्या भाजल्या नाहीत’, या कारणावरून शिवीगाळ करत जोरदार वादावादी झाली. यावेळी अजयकुमार पटेल बाजूला बसला होता. बहिणीवरून शिवी दिल्याच्या रागातून जोराचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातून संशयित वैभव कांबळे व चिदानंद खोत यानी चिडून इद्रीसवर हल्ला करून दांडक्याने मारहाण केली. या मारहणीत इद्रीस यादवच्या डोक्यात दांडक्याचा वर्मी घाव बसल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात घडलेल्या घटनेची माहिती संशयितांनी संबंधित ठेकेदाराला दिली. ठेकेदाराने याबाबत कुपवाड पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी संशयीतांचा शोध घेऊन संशयित दोघांना गजाआड केले. चौकशीत संशयितांनी पोलिसांना खून केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेले दांडके पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहे.