कणकवलीत परप्रांतीयावर धारदार शस्त्राने हल्ला
शाब्दिक बाचाबाचीतून मारहाण : अज्ञातावर गुन्हा दाखल
कणकवली:वार्ताहर
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात बुधवारी पहाटे दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकाने दुसऱ्याच्या डोक्यात धारधार शस्त्राने हल्ला केल्याने लोकेश बिष्ट (२२, रा. कणकवली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकाजवळ दोन परप्रांतीय तरुण एकमेकांशी भिडले. सुरुवातीला त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. मात्र, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या एकाने लोकेश बिष्ट याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. हा वार थेट डोक्यात लागल्याने लोकेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.घटनेची माहिती मिळताच कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनशाम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलवडे आणि सहायक पोलीस निरीक्षक नागेश चिकने यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच हल्ला करणारा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. जखमी लोकेश बिष्ट याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले. या घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.