For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘मध्यावधी’ मतदानाला अमेरिकेत प्रारंभ

06:40 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मध्यावधी’ मतदानाला अमेरिकेत प्रारंभ
Advertisement

अध्यक्ष ट्रंप यांच्यासाठी अतिमहत्वाच्या निवडणुका

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे सिनेट (वरीष्ठ प्रतिनिधीगृह) आणि काँग्रेस (कनिष्ठ प्रतिनिधीगृह) या लोकप्रतिनिधीगृहांच्या मध्यावधी निवडणुकांसाठी त्या देशात मतदानाला प्रारंभ झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी नंतरच्या मध्यरात्रीच अनेक प्रांतांमध्ये मतदान करण्यास प्रारंभ झाला. अमेरिकेत तीन समयविभाग (टाईम झोन्स) असल्याने भिन्न भिन्न प्रांतांमध्ये वेगवेगळ्या वेळी मतदानाला प्रारंभ केला जातो. मतदान मंगळवारी रात्रीपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्वरित मतगणनेस प्रारंभ केला जातो. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी दुपारपर्यंत या निवडणुकांचा परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. या निवडणुका रिपब्लिकन पक्ष आणि डेमॉव्रेटिक पक्ष या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात.

Advertisement

सध्या दोन्ही प्रतिनिधीगृहांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्ष ट्रंप यांच्या धोरणांना लोकप्रतिनिधीगृहांचे समर्थन मिळू शकते. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधीगृहांमधील बहुमत टिकवून धरणे हे ट्रंप यांच्यासमोरचे आव्हान आहे. तर 2028 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भवितव्य चांगले राहण्यासाठी डेमॉव्रेटिक पक्षालाही या निवडणुकांमध्ये यश संपादन करुन दोन्ही प्रतिनिधीगृहांमध्ये बहुमत मिळविणे आवश्यक आहे.

एकंदर 470 जागा

या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह काँग्रेसच्या सर्व 435 जागांसाठी मतदान होत आहे. तर सिनेटच्या एक तृतियांश, अर्थात 35 जागांसाठी मतदान होत आहे. अशा प्रकारे 470 जागांसाठी हे मतदान आहे. याखेरीज अमेरिकेच्या 36 प्रातांचे गव्हर्नर्सही निवडले जाणार आहेत. प्रांतीय मंडळांच्या एकंदर जागा 6 हजारांहून अधिक आहेत. त्यामुळे या निवडणुका जनमताचे व्यापक निर्देशक ठरणार आहेत. दोन्ही पक्षांनी जीव तोडून प्रचार केलेला आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल

सध्या अमेरिकेच्या कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृहाच्या 435 जागांपैकी रिपब्लिकन पक्षाकडे 219 तर डेमॉव्रेटिक पक्षाकडे 214 जागा आहेत. अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाकडे चार जागांचे बहुमत आहे. एक जागा सभाध्यक्षांची आहे. ज्येष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटच्या 100 जागांपैकी रिपब्लिकन पक्षाकडे 53 जागा तर डेमॉव्रेटिक पक्षाकडे 45 जागा आहेत. तसेच दोन अपक्षही सदस्य आहेत. टेक्सास, मिशिगन, मेन आणि अलास्का हे प्रांत वरीष्ठ प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीकरता महत्वाचे मानले जात आहेत. दोन्ही सभागृहांच्या निवडणुकांमध्ये अनेक जागांवर अत्यंत चुरशीचा संग्राम होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.