जपानमध्ये होणार मध्यावधी निवडणूक
पंतप्रधान तकाइचींकडुन प्रतिनिधिगृह विसर्जित
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या पंतप्रधान सनाए तकाइची यांनी शुक्रवारी संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित केले असून यामुळे देशात 8 फेब्रुवारी रोजी मध्यावधी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तकाइची यांनी हा निर्णय केवळ तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतरच घेतला आहे.
ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झालेल्या तकाइची यांना आतापर्यंत जवळपास 70 टक्क्यांची सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. याच लोकप्रियतेचा लाभ घेत त्या सत्तारुढ पक्षाची स्थिती मजबूत करू इच्छित आहेत. सत्तारुढ पक्षाला मागील काही वर्षांमध्ये मोठे राजकीय नुकसान झेलावे लागले होते.
संसदेचे सभागृह विसर्जित करण्यात आल्याने अर्थसंकल्पावरील मतदान टळले आहे. कमकुवत अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि वाढत्या महागाईला रोखण्याच्या उद्देशाने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 465 सदस्यीय कनिष्ठ सभागृह विसर्जित होताच 12 दिवसांची निवडणूक प्रचार मोहीम सुरू होणार असून याची औपचारिक सुरुवात मंगळवारपासून होणार आहे.
मी पंतप्रधानपदी रहावे की नाही याचा निर्णय जनतेने घ्यावा अशी माझी इच्छा आहे. या निवडणुकीलामी स्वत:च्या राजकीय भविष्याशी जोडत असल्याचे तकाइची यांनी म्हटले आहे. कठोर भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुराणमतवादी नेत्या तकाइची या माजी पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्यापेक्षा वेगळ्या धोरणांना जनतेसमोर मांडू इच्छितात. तकाइची यांच्या अजेंड्यात अधिक शसकीय खर्च, सैन्यशक्तीत वाढ आणि कठोर स्थलांतरविरोधी धोरण सामील आहे.
युवांमध्ये लोकप्रिय प्रतिमा
तकाइची यांची प्रतिमा युवा मतदारांमध्ये लोकप्रिय आहे, परंतु सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) अद्याप राजकीय फंडिंग घोटाळ्याच्या आरोपातून सावरत आहे. यामुळे अनेक पारंपरिक मतदार उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या दिशेने वळत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळविण्याचे लक्ष्य तकाइची यांचे आहे.