मध्यान्ह आहारातून विषबाधा; 35 हून अधिक विद्यार्थी अत्यवस्थ
मार्कंडेयनगर-मच्छे येथील घटना : सिव्हील हॉस्पिटलसह विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू
बेळगाव : मार्कंडेयनगर-मच्छे येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत मध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याने 35 हून अधिक विद्यार्थी अत्यवस्थ झाले आहेत. मंगळवार सायंकाळी या विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी, डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलसह विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, शिक्षण आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी शाळेला आणि रुग्णालयांना भेट देऊन माहिती जाणून घेतली.मार्कंडेयनगर-मच्छे येथे असलेल्या उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेत मंगळवारी दि. 22 जुलै रोजी दुपारी या विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मध्यान्ह आहार देण्यात आला. मात्र, जेवणामध्ये पाल आढळून आल्याने काही वेळानंतर विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले.
सायंकाळी या सर्व विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे प्रथम आठ विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. टप्प्याटप्प्याने 35 हून अधिक विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विविध खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ही माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच पालकांनी शाळेसह रुग्णालयांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक एन. आय. कट्टीमनीगौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. उपलब्ध माहितीनुसार 35 हून अधिक विद्यार्थी बाधित झाले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आहारात पाल आढळली
मार्कंडेयनगर-मच्छे येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पुरविण्यात आलेल्या मध्यान्ह आहारात पाल आढळून आली आहे. जेवण करत असताना प्रथम एका विद्यार्थ्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. यानंतर 35 हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना सिव्हील हॅस्पिटलसह विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. रमेश दंडगी,तालुका आरोग्य अधिकारी