भारतात मायक्रोसॉफ्ट 25,722 कोटी गुंतवणार
देशातील क्लाउड एआय व्यवसायासाठी कंपनीची योजना : सीईओ सत्या नडेला यांची घोषणा
नवी दिल्ली :
दिग्गज टेक क्षेत्रातील कंपनी मायक्रोसॉफ्ट यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मंगळवारी भारतातील आगामी क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) व्यवसायात 2 वर्षांत 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25,722 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. सीईओ सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट एआय टूरच्या बेंगळूरूमध्ये ही घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करताना, सत्या नडेला यांनी लिहिले, ‘देशाच्या एआय मोहीमेला गती देण्यासाठी भारतातील एआयच्या पायाभूत सुविधा आणि कौशल्यामधील आमच्या नवीन गुंतवणूकीची घोषणा करण्यास उत्सुक आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये एआयमध्ये भरपूर क्षमता :सीईओ नडेला
ही घोषणा भारताला एआय प्रथम राष्ट्र बनवण्यात मदत करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. नडेला यांनी यापूर्वी सांगितले होते की, एआयमध्ये भारतात भरपूर क्षमता आहे.
कंपनीचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टने या वेगाने पसरणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी सहाय्यकाची भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा असल्याचे नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा व्यक्त केली होती.
एकदिवसापूर्वीच पंतप्रधानांची भेट
सत्या नडेला यांनीही एक दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांनी एक्स वर या बैठकीचा एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना नडेला यांनी लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद. भारताला एआयमध्ये-प्रथम राष्ट्र बनवण्याची आमची वचनबद्धता पुढे नेण्यासाठी आणि देशात आमच्या निरंतर विस्तारासाठी एकत्र काम करण्यासाठी आम्ही उत्साहित आहे.