जगातील मूल्यवान कंपनीचा मान मायक्रोसॉफ्टला
अॅपलला टाकले मागे: समभागावर परिणाम
नवी दिल्ली :
आयफोन निर्माती कंपनी अॅपल ही आता जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी राहिलेली नाही. सदरच्या कंपनीला मायक्रोसॉफ्टने आघाडीवर राहत मात दिली आहे. या बातमीनंतर गुरुवारी अॅपलच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.
काय आहे कारण
मिळालेल्या माहितीनुसार 2024 हे वर्ष मागणीच्या तुलनेमध्ये कठीण असणार असल्याची बाब समोर आली आहे. याचा परिणाम अॅपलच्या समभागावर दिसून आला. याच दरम्यान अॅपलचे समभाग गुरुवारी 0.9 टक्के इतके घसरणीत राहिले होते. यानंतर अॅपलचे बाजार भांडवल मूल्य 2.871 ट्रिलियन डॉलर इतके राहिले होते. अॅपलचे समभाग यावर्षी आत्तापर्यंत 3.3 टक्के घसरणीत राहिले आहेत.
2021 नंतर प्रथमच मायक्रोसॉफ्ट आघाडीवर
मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे समभाग गुरुवारी 1.6 टक्के इतके वाढताना दिसले. यानंतर कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 2.875 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. कंपनी लवकरच जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमाई करण्याची योजना बनवत आहे. सदरची बाब ही गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी ठरली. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे समभाग मात्र 1.8 टक्का तेजीत राहिले होते. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल 2021 नंतर पहिल्यांदाच अॅपलच्या बाजार भांडवलापेक्षा अधिक झाले आहे.