मार्चच्या तिमाहीमध्ये मायक्रो फायनान्सच्या वितरणात घट
नवी दिल्ली :
मार्च 2025 मध्ये मायक्रो फायनान्सच्या वितरणात घट झाली, जी वर्षाच्या आधारावर 38 टक्के कमी आहे. मार्च 2025 च्या तिमाहीच्या अखेरीस मागील तिमाहीच्या तुलनेत हंगामी घटकांमुळे सूक्ष्मवित्त वितरणात वाढ झाली परंतु गेल्या वर्षीपेक्षा कमी होती.
सीआरआयएफ अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत कर्ज वितरण 12.2 टक्क्यांनी वाढून 71,580 कोटी रुपये झाले, परंतु ते गेल्या वर्षीच्या 1.15 लाख कोटी रुपयांपेक्षा 38 टक्के कमी होते. वर्षाच्या आधारावर एकूण कर्ज पोर्टफोलिओ 14 टक्क्यांनी घटले. मार्च 2025 मध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत ते 2.6 टक्क्यांनी कमी होऊन 3.81 लाख कोटी रुपये झाले. मार्च 2024 मध्ये ते 4.42 लाख कोटी रुपये होते तर डिसेंबर 2024 मध्ये ते 3.91 लाख कोटी रुपये होते. याशिवाय, नवीन कर्जदारांची संख्याही कमी झाली तर सक्रिय कर्जे मार्च 2024 मध्ये 16.1 कोटींवरून मार्च 2025 मध्ये 14 कोटींवर आली. त्यामुळे, सक्रिय ग्राहकांची संख्या कमी झाली.
या कालावधीत सक्रिय ग्राहकांची संख्या 8.7 कोटींवरून 8.3 कोटींवर आली आहे आणि ही संख्या उद्योगाच्या स्थितीबद्दल बरेच काही सांगते.